केक नव्हे, वृक्षारोपन करून साजरा झाला वाढदिवस !

0
498

सामाजिक कार्यकर्ते विलास सोबले यांचा उपक्रम : ३०० झाडांचे संगोपन करणार

सोबलेवाडी : पारनेर अपडेट मिडिया

वाढदिवसाला केक कापून मोठया मेजवाणीचे आयोजन करण्याचे फॅड सर्वत्र असताना केक अथवा मेजवाणीला फाटा देउन वाढदिवसाच्या दिवशी केक न कापता वृक्षारोपन करून पर्यावरणाच्या संतुलनास हातभार लावण्याचा अनोखा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विलास सोबले यांनी हाती घेतला आहे.

सोबलेवाडी येथील अजय सोबले या तरूणाच्या वाढदिवसापासून या उपक्रमास सुरूवात करून सोबलेवाडी, बुगेवाडी परीसरात तिनशे झाडांचे रोपण करून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बेसुमार वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळले असून त्याचे दुष्परीणाम सध्या पहावयास मिळत आहेत. शासनाकडून दरवर्षी वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती घेतला जात असला तरी तो फारसा परिणामकाररित्या राबविला जात नसल्याने त्याचे दृष्य परिणाम दिसून येत नाहीत. सोबले यांच्या संकल्पनेतून आता लावण्यात आलेल्या झाडाचे संगोपन करून सोबलेवाडी व बुगेवाडी पर्यवरणसमृद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोबले यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. सोबलेवाडी येथील प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजीटल करण्यात आली असून एक वर्षापूर्वी शाळेच्या आवारात वृक्षारोपनही करण्यात आले. वर्षभर या वृक्षांचे संगोपन करण्यात आल्याने सर्व वृक्षांची झपाटयाने वाढ होत आहे.

वाढदिवसाबरोबरच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही एक वृक्ष लावण्यात येऊन त्याचे संगोपन करण्यात येणार आहे. सुख व दुःखाच्या प्रसंगात सर्वानी एकत्र येत सामाजिक बांधीलकी जोपासण्याचाही उपक्रम सोबलेवाडी तसेच बुगेवाडी परिसरातील नागरीकांनी हाती घेतला आहे. वृक्षारोपन कार्यक्रमास विलास सोबले यांच्यासह नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय औटी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here