आमदार नीलेश लंके यांचा सवाल : तराळवाडी येथे बाकांचे वितरण
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्यानंतर पहिल्याच महिन्यात १० कोटीचा निधी आपण मंजुर करून आणला. पुढील महिन्यात आणखी पाच कोटींचा निधी वर्ग होईल. अभ्यासू, कार्यसम्राट म्हणवून घेणारांना मागील पाच वर्षात एकाच वेळी दहा कोटींचा निधी मिळविता आला का ? मला बजेट समजणार नाही असे हिणवणारांना अडीच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघासाठी पाचशे कोटींचा निधी आणला आला का ? अशी घणाघाती टीका आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे नाव न घेता केली.
आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते यांच्या वतीने त्यांच्या प्रभागात ४१ बाकांचे वितरण करण्यात आले. त्यानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात आ. लंके हे बोलत होते. पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष विजय औटी, अर्जुन भालेकर, अशोक चेडे, योगेश मते, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ.सचिन औटी, विजय भास्कर औटी, बाळासाहेब नगरे, सुभाष शिंदे, भुषण शेलार, विलास मते, बाळासाहेब देशमाने, रामभाऊ मते, विजय डोळ, दगडू शेरकर, डॉ. मुदस्सीर सय्यद, संजय मते, निवृत्ती मते, दीपक नाईक, बंडू गायकवाड, संदीप चौधरी, सत्यम निमसे, अक्षय चेडे, गणेश साळवे, सुहास नगरे, बाळासाहेब मते, बबन चौरे, सुभाष मते, अर्जुन बढे, अशोक गायकवाड, दादा शेटे, रविंद्र मते, राहुल शेटे, ऋषिकेश औटी,अर्जुन मते, महेंद्र मगर, शिवाजी मते, नवनाथ गाडगे, राजकुमार मते, सुभाष देशमाने, संदीप मते, सुदाम मते, रावसाहेब शेरकर, नितीन तराळ, सागर मते, दादा औटी, वसंत ठुबे, रोहित तराळ, घनश्याम औटी, सीताराम तराळ,राम औटी, विजय शेटेआदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, मतदारसंघासाठी, शहरासाठी निधी खेचून आणण्यासाठी ताठर भुमिका न घेण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळेच कोरोनाचे संकट असूनही अडीच वर्षांच्या कालावधीत पाचशे कोटींचा निधी पदरात पाडून घेण्यात आपणास यश आले. मागील पंधरा विस वर्षांचा विचार करा, योेगेश मते यांच्या प्रभागात ५० ते ६० लाखांपेक्षा अधिक निधी मिळू शकला नाही. नगरपंचायतीच्या निवडणूकीनंतर आपण या प्रभागासाठी सव्वा कोटींचा निधी देत या प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्मशनभुमी, व्यायामशाळेसाठी जागा द्या, तुम्हाला दोन्ही कामांसाठी निधी देण्याची आपली तयारी आहे. कोल्हापूर पध्दतीच्या बंधायाचे सर्वेक्षण करून तो पुर्ण करण्याबरोबरच सहा महिन्यात सभामंडपही उभारून देऊ. आपल्या आमदारकीच्या पुढील अडीच वर्षात या प्रभागाचे सर्व प्रश्न मार्गी लावून दाखवू अशी ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.
विजेचा सिंगल फेजचा जसा या प्रभागाचा प्रश्न आहे. तसाच प्रश्न संपूर्ण शहराचाही आहे. त्यात काही तांत्रीक अडचणी आहेत. परंतू विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक बोलवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे ते म्हणाले.
दोन महिन्यांच्या आत पाणी प्रश्न मार्गी लागणार
कोणत्याही निवडणूकीत पारनेर शहराच्या पाणीप्रश्नाची चर्चा होत असे. अनेकांनी त्याचे भांडवल करून निवडणूका जिंकल्या. हा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचा आपण विडा उचलला असून येत्या दोन महिन्यांच्या आत हा प्रश्न मार्गी लागणार आहे. पाणी योजनेबाबत आपली अर्जुन भालेकर यांच्याशी चर्चा झाली असून ढवळपूरी येथील साठवण टाकीच्या जागेचा प्रश्नही मार्गी लागल्याने आता या कामातील त्रृटीही दुर झाली आहे.
जिल्हयात नाही असे आंबेडकर भवन उभारणार
पारनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी ६० लाखांचा निधी मंजुर झाला आहे. आजूनही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यातून जिल्हयात नाही असे आंबेडकर भवन उभारून आदर्श निर्माण करण्याचे आवाहन आ. लंके यांनी केले.
नगरपंचायत इमारतीसाठी १० कोटी
नगरपंचायतीच्या इमारतीसाठी नगरविकास खात्याकडून ५ कोटी रूपये मंजुर करून घेण्यात आले आहेत. अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आणखी पाच कोटी रूपये मंजुर करून घेऊन लवकरच स्वमालकीची नगरपंचायतीची इमारत उभारण्यात येणार असल्याचे लंके यांनी सांगितले.
१२ ज्योर्तीलिंग, सिध्देश्वरचा पर्यटन विभागात समावेश करण्यासाठी प्रयत्न
शहरातील १२ ज्योर्तीलिंग तसेच सिध्देश्वर मंदीराचा पर्यटन विभागात समावेश करण्यासंदर्भात आपण पर्यटनराज्यमंत्री आदीती तटकरे यांच्याशी चर्चा केली आहे. तसा प्रस्तावही त्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पर्यटन विभागामार्फत शहराचा विकास करण्यासाठी आणखी निधी उपलब्ध होऊ शकेल असे ते म्हणाले.
योगेश मतेंचा फायदा शहरासाठी होईल
योगेश मते हे अभ्यासू नगरसेवक आहेत. त्यामुळेच आव्हानात्मक पाणीपुरवठा समितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. निवडणूकीनंतर काही तासांमध्येच त्यांनी लाखो रूपयांची कामे मंजुर करून घेतली. आणखी मागण्यांची यादीही भरपूर मोठी आहे. त्यांच्या मागण्या पुर्ण होतील. त्यांच्या अभ्यासाचा फायदा शहरासाठी होईल असा गौरव आ. लंके यांनी केला.