पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार
भाळवणी : पारनेर अपडेट मिडिया
लोकप्रतिनिधी स्वतःचा जिव धोक्यात घालून कसे काम करू शकतो ? आमदार लोकांच्या कल्याणासाठी पेटून उठला तर कसे काम उभे राहू शकते असे काम आमदार नीलेश लंके यांनी राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
मंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी आ. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील भाळवणी येथे सुरू असलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करीत आ.लंके यांचे कौतुक केले. यावेळी आ. लंके यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, तहसिलदार ज्योती देवरे, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, अशोक सावंत,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अॅड. राहुल झावरे, विक्रमसिंह कळमकर,राजेश्वरी कोठावळे, डॉ. बाळासाहेब कावरे, कारभारी पोटघन, बापूसाहेब शिर्के, अभयसिंह नांगरे, दत्ता कोरडे, मुंकूद शिंदे, डॉ. मानसी मानोरकर, दिपक लंके, बाळासाहेब खिलारी, प्रमोद गोडसे, संदीप चौधरी, सचिन पठारे, गणेश भापकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, एखादा लोकप्रतिनिधी स्वतःचा जिव धोक्यात घालून कीती व कसे काम करू शकतो हे आ. लंके यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. आपली जनता दुःखी आहे, कष्टी आहे, महामारीच्या फेऱ्यात ती अडकली आहे, तीला अधार देणं तीच्या सोबत राहून हा संसर्गजन्य आजार आहे हे माहीती असतानाही दिवस रात्र आपली सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतलं आहे. ‘लोकच नसतील तर मी आमदार राहून उपयोग काय ?’ अशा भावना आ. लंके यांनी अतिशय निरपेक्षपणे व्यक्त केल्या. जनतेसाठी त्यांनी शरद पवार यांच्या नावाने कोव्हिड सेंटर सुरू केले. लोक या रोगाला घाबरले नाहीत, आत्मविश्वास जिद्दीने त्याला तोंड दिले, हसतमुखाने परिस्थितीशी मुकाबला केला तर माणसाला काही होऊ शकत नाही हे मर्म आ. लंके यांनी सांगितले. आ. लंके यांच्या या सेंटरने ते दाखवून दिले आहे. लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे, त्यांच्या मनात मला काहीही होणार नाही ही भावना निर्माण करणे याची या सेंटरमध्ये काळजी घेण्यात येत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
भारताचा तिसरा क्रमांक !
..पहिल्या व दुसऱ्या लाटेत जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती आपण घेऊ शकलो नाही. लग्न समारंभ, धर्मीक कार्यक्रम पार पडले. कोरोना संपला, आता तो येणारच नाही ही भावना मनामध्ये ठेवल्याने दुसरी लाट मोठया प्रमाणात आली. त्यात कुटूंबच्या कुटूंब मृत्यूमुखी पडले. आज आपला देश जगात मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना
तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असेल असे तज्ञ सांगत आहेत. ज्या अडचणी दुसऱ्या लाटेत आल्या त्या येणारच नाही अशा प्रकारच्या उपाययोजना जिल्हयात करण्यात येणार आहेत. शिर्डी येथील प्रसादालयात हजारो लोक भोजन करू शकतात. भक्त निवासात लाखो लोकांच्या निवासाची सोय होईल. त्यामुळे पन्नास टक्के रूग्णांची तेथे सोय करण्यात येेईल. उर्वरीत पन्नास टक्के रुग्णांची जिल्हा रूग्णालय तसेच आ. लंके यांच्या सारख्या सेवाभावी कोव्हिड सेंटरमध्ये सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लहान मुलांसाठी बेड, आयसीयू
तिसरी लाट आलीच तर परिणामकारक उपाययोजना करण्यात येत आहेत. ऑक्सिजन अभावी मृत्यू होणार नाहीत यासाठी जिल्हयात सात ते आठ ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मीती करण्याचे प्लॅट उभारले जात आहेत. लहान मुलांसाठी बेड तसेच आयसीयुची व्यवस्था उभारली जात आहे.
राज्याचे उजवे काम
महाराष्ट्राने कोरोनाचा अतिशय चांगल्या पद्धतीने मुकाबला केला. सुप्रिम कोर्ट, केंद्र सरकारचा निती आयोग तसेच पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनीही त्याचे कौतुक केले आहे. एका वृत्तवाहीनीने महाराष्ट्र, केरळ, उत्तरप्रदेश तसेच दिल्ली या राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये ६५ टक्के लोकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. सरकारने कोरोना नियंत्रणात आणताना कोणतीही आकडेवारी लपविलेली नसल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.