पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायतीच्या सतरा सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदानानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने नगरपंचायती कोणाचा झेंडा ? याची उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपुष्टात आली असून शहर विकास आघाडीच्या दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधून विजयी झालेल्या विकास आघाडीच्या नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आघाडीचे प्रभाग क्रमांक ८ चे शहर विकास आघाडीचे दुसरे उमेदवार भूषण शेलार यांनीही आमदार लंके यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आमदार लंके तसेच अर्जुन भालेकर व भूषण शेलार यांच्याशी आमदार लंके यांनी बुधवारी सायंकाळी चर्चा केली होती. त्याच वेळी हा निर्णय झाला होता. गुरुवारी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित सात नगरसेवक तसेच आघाडीचे दोन अशा नगरसेवकांची एकत्रित गट नोंदणी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. दरम्यान, आणखी काही नगरसेवक आमदार लंके यांच्या संपर्कात असून ते देखील राष्ट्रवादीला साथ देणार असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान, गटनोंदणीनंतर नगरच्या राष्ट्रवादी भवन येथे सुरेखा भालेकर, भुषण शेलार यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश सोहळा होणार आहे. प्रवेशानंतर आ. लंके यांची पत्रकार परिषद होणार आहे.