आमदार नीलेश लंके यांचा पुढाकार
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
उद्योगात उत्तुंग भरारी घेतल्यानंतर समाजकारण व राजकारणात वेगळा ठसा उमटविणारे अर्जुनशेठ भालेकर यांची नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत भालेकर यांच्या पत्नी सुरेखा यांनी मोठया फरकाने विजय संपादन करून राजकारणातील आपले वेगळेपण सिध्द केले आहे. शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढविलेल्या भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच दिवशी अर्जुन भालेकर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली.
गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समर्थन देणाऱ्या ९ नगरसेवकांची नगर येथे गटनोंदणी करण्यात आली. सर्व नगरसेवकांचा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आल्यानंतर अर्जुन भालेकर यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय आमदार नीलेश लंके यांनी घेतला. जिल्हाध्यक्ष फाळके यांनी भालेकर यांना नियुक्तीचे पत्र देउन सत्कार केला.
भालेकर यांच्या नियुक्तीनंतर बोलताना आमदार नीलेश लंके म्हणाले, भालेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे पाईक आहेत. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढविली असली तरी एकाच विचार प्रवाहाचे असल्याने त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. अर्जुन भालेकर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना सन्मान राखण्यात आला असून भविष्यातही त्यांना संधी दिली जाईल. पारनेर नगरपंचायतीमधील कामाचा सुरेखाताई यांना अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नव्या नगरसेवकांना होणार आहे. एक आदर्श नगरपंचायत निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्यास सुरेखाताई तसेच भुषण शेलार यांची साथ लाभल्याचे ते म्हणाले.
नियुक्तीनंतर बोलताना अर्जुन भालेकर म्हणाले, आमदार नीलेश लंके यांनी मतदारसंघात आदर्श काम उभे केले आहे. त्यांच्या या कामाची देश विदेशातही दखल घेण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आपणास निश्चित आनंद वाटेल. नगरपंचायतीच्या माध्यमातून पारनेर शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा मनोदय व्यक्त करतानाच प्रभाग क्र. १० मधील उर्वरीत कामेही आ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येणार असल्याचे भालेकर यांनी सांगितले.