पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
मुलींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम तर व्हायलाच हवे. परंतु, त्यांनी स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी कराटे प्रशिक्षणही घ्यायला हवे. असे प्रतिपादन राजेश्वरी कोठावळे यांनी केले.
पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षांतर्गात स्व – संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कु. राजेश्वरी कोठावळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर हे होते.
राजेश्वरी कोठावळे पुढे म्हणाल्या, आपल्यावर होणारा अन्याय आपण सहन न करता त्याला विरोध करायला शिकले पाहिजे. काहीवेळा आपल्यावर आलेल्या वाईट प्रसंगाना आपण मूकपणे सामोरे जातो. त्याबद्दल वाच्चता झाली तर समाजात आपली नाचक्की होईल या गैरसमजातून आपण पोलिसांकडे जाणे टाळतो. इथेच आपली चूक होते. आपण गुन्हेगारांना पाठीशी घालून त्यांच्या कृतीला खतपाणी घालण्याचे काम करतो. हे आता थांबायला हवं. त्यासाठी आपल्यातील ताकत, हिम्मत ओळखून आपण जागृत व्हायला हवे. ती आज काळाची गरज बनली आहे. टिव्ही आणि मोबाईलचा वापर मनोरंजनासाठी करण्याऐवजी व्यक्तिमत्त्व विकासासाठी करावा. असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिकातून धडे दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, उच्च शिक्षण घेण्यामध्ये मुलींचे प्रमाण वाढले आहे. शैक्षणिक गुणवत्तेत मुली कोठेच कमी नसतात. मुलींच्या व्यक्तीमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केली जातील. यातील सहभागामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ दिलीप ठुबे, प्रा. महेश आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, डॉ. माया लहारे, सर्व महिला प्राध्यापक व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभदा आरडे यांनी केले तर आभार प्रा.विद्या ठुबे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा तनपुरे यांनी केले.