गृहमंत्र्यांचे पुतणे घटनास्थळी : पहाटे गुन्हा दाखल : जवळ्यातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर
जवळे : पारनेर अपडेट मिडिया
उसाचे वाढे दिले नाहीत म्हणून तालुक्यातील जवळे येथे मंगळवारी सायंकाळी सशस्त्र हल्ला होऊन गंभीर जखमी झालेले उसतोडणी कामगार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पराग अॅग्रो साखर कारखान्याचे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे ! या कामगारांवर जिवघेणा हल्ला झाल्यानंतर वळसे पाटील यांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील यांनी हस्तक्षेप केल्यानंतर बुधवारी पहाटे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती हाती आली आहे.
नगर व पुणे जिल्हयाच्या सिमेवर गेल्या काही दिवसांपासून काही संशयास्पद गुन्हे घडत असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघापासून हाकेच्या अंतरावर या घटना घडत आहेत हा विलक्षण योगायोग आहे ! नगर पुणे जिल्हयाच्या सिमेवर सुरूवातीस पारनेर ग्रामिण पतसंस्थेची शाखा लुटण्यात आली. त्यावेळी तेथील शाखाधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. पुढे पुणे जिल्हयातील पिंपरखेड येथे बँक ऑॅफ महाराष्ट्रची शाखा लुटण्यात आली. त्यातील आरोपी पारनेर तालुक्यात आश्रयास होते. मुददेमालही पारनेर तालुक्यातूनच हस्तगत करण्यात आला. पुणे जिल्हयातील १४ नंबर येथील पतसंस्थेची शाखा लुट प्रकरण, आळेफाटा येथील दुकाणदाराची लुट या घटनाही पारनेरच्या सिमेजवळच घडल्या !
पारनेर तालुक्यातील जवळे येथे शाळकरी विद्यार्थीनीवर अत्याचार करण्यात येउन तिचा खून करण्यात आला. अद्यापही या गुन्हयातील मुख्य सुत्रधार फरार आहे. हे कमी म्हणून की काय जवळे येथूनच तालुक्यातीलच आरोपींनी एटीएम लुटून नेले. या गुन्हयातील आरोपी जेरबंद करण्यात आल्यापाठोपाठ जवळे येथेच उसतोडणी मजुरांवर सशस्त्र हल्ला झाल्याने विशेषतः जवळयाबरोबरच पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आल्याचे माणले जात आहे.
पारनेर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी सायंकाळी ईश्वर रोहिदास मोरे (वय २५, रा. मालशेवगा ता. चाळीसगांव, जि. जळगांव) हा उसतोडणी कामगार मंगळवार दि. ४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भाचा मन्या धोंडू पवार, रोहित संदीप वाघ तसेच आकाश रोहिदास मोरे हे त्यांच्या बैलगाडीत ज्ञानदेव सालके यांच्या शेतामधील उस तोडणी करून उसाचे वाढे भरून जावईवाडी येथून त्यांच्या पालाकडे येत होते. त्यावेळी अलका गिरे यांच्या घरापुढे त्यांची बैलगाडी आली असता एक इसम व एक मुलगा यांनी गाडीसमोर येऊन आम्हाला वाढे पाहिजेत, थांबा असे त्यांना सांगण्यात आले. वाढे शिल्लक नाहीत असे सांगितल्यानंतर ते देाघे बैलाची वेसन धरून ते गाडी पुढे जाउ देत नव्हते. बैलाची वेसेन सोडा बैल मारेल असे ईश्वर याने सांगितल्याच्या राग येऊन त्या इसमाने ईश्वर याच्या पायास धरून खाली ओढले. उसाचे वाढे काढून त्यास मारहाण करण्यात आली. ईश्वर याचा भाचा तसेच मुलाने या भांडणातून सुटका केल्यानंतर ते तिघेही पालावर निघून गेले.
मारहाणीबाबत ईश्वर याने भाऊ सागर, मेव्हणा दत्तू पवार, भाचा गणेश पवार यांना माहीती दिली. त्यानंतर ते सर्व घटनास्थळी जाब विचारण्यासाठी गेले असता अलका गिरे, तिची मुलगी, मारहाण करणारा जाड माणूस व इतर १० लोक तेथे उपस्थित होते. त्यांना मारहाणीविषयी विचारले असता त्यांनी मारहाण करून शिविगाळ करण्यास सुरूवात केली. त्यांच्या हातामध्ये काठया, गज, लोखंडी पाईप होते. त्यांनी डोक्यात गजाने मारहाण केली. एकाने लाखंडी पाईपने डोक्यात जोराचे फटके मारले. एकाने कोयत्याने डोक्यावर घाव घातले. लोखंडी पाईपने तोंडावर मारहाण करण्यात आली. लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सरपंच सुभाष आढाव, पराग कारखान्याचे अधिकारी खंडू विठठल आढाव व इतरांनी ही मारहाण थांबविली.
या घटनेची माहीती समजल्यानंतर पराग कारखान्याचे संचालक तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कामगारांना दिलासा दिला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर पारनेर पोलिस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.