पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ तथा सर्वांच्या माई अचानक गेल्याचे समजले. अतिशय दुःख झाले. गेली अनेक वर्षे अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या भेटी झाल्या होत्या. आज त्यांच्या जाण्यामुळे मन खूप अस्वस्थ झाले असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ समजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.
अण्णा म्हणाले, एक गोष्ट नेहमी प्रकर्षाने जाणवते की आज समाजामध्ये समुद्राला आलेल्या भरतीप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे. पण दुसरीकडे सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेली माईंसारखी माणसे कमी होत चालली आहेत. ही समाजाची कधीही भरून न निघणारी हानी आहे.
सध्याच्या काळात माणसे मी आणि माझ्या पलिकडे पहायला तयार नाहीत. अशा स्थितीत सिंधुताईंनी अनाथांची माय होऊन जे काम केले ते अतिशय महत्त्वाचे आहे. समाजासाठी जीवन समर्पित केल्यामुळे त्या सतत दीनदुबळ्यांसोबतच राहिल्या. त्यांच्या निधनामुळे आज अनेकांनी आपला आधार गमावला आहे. पण शेवटी ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. समाजाने त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
माईंनी आपले संपूर्ण समाजासाठी दिले. खूप मोठी सेवा त्यांच्या हातून घडली आहे. भगवतगीतेत म्हटल्याप्रमाणे त्यांना मोक्षप्राप्ती झालेलीच आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चीरशांती मिळो अशी प्रार्थना हजारे यांनी केली.