पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
शेतीचे पंप तसेच पाणी योजनेच्या पंपांना असलेल्या केबलमधील तांब्याच्या तारांवर चोरटयांची वक्रदृष्टी फिरल्याने तालुक्यातील गुणौरे येथील सार्वजनीक पाणी योजनेचे पाणी नागरीकांना मिळू शकले नाही. तर सात ते आठ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची केबलही याच कारणासाठी चोरून नेण्यात आल्याने या शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांना पाणी देण्याचाही खोळंबा झाला आहे.
कुकडी कालव्याच्या पट्ट्यामध्ये विजपंपांच्या केबल, विज पंप चोरीच्या घटना नित्याच्याच आहेत. गेल्या काही दिवसांत या घटना थंडावल्या होत्या. मात्र गुणौरे येथील घटनेमुळे त्या पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुकडी नदीवरील बंधाऱ्यानजीक गुणोरे गावाच्या पिण्याच्या पाणी योजनेची विहीर आहे. या विहीरीमधील पाणबुडी मोटारची केबल बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कट करून चोरून नेली. याच परिसरात बंधाऱ्यावर काही शेतकऱ्यांच्या मोटारी आहेत. त्यापैकी ७ ते ८ पंपाच्या केबल तोडून घेण्यात आल्या.
याच परिसरातील झुडूपांमध्ये या केबल सोलण्यात येऊन त्यातील तांब्याची तार लांबविण्यात आली. गुरूवारी सकाळी काही नागरीक शेतीपंप सुरू करण्यासाठी बंधाऱ्यावर गेले असता हा प्रकार उघडकीस आला. झुडूपांमध्ये केबलचे वेस्टन आढळून आल्याने तांब्याच्या तारांसाठी चोरटयांनी पाणी योजना तसेच शेतीपंपांच्या केबलची चोरी केल्याचे उघड झाले.