लोणावळा : पारनेर अपडेट मिडिया
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र व भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पो चालकाचे येथील तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो भाजीची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर मागून जोरात आदळला. त्या धक्क्यानं भाजीचा टेम्पो पुढच्या कारवर आदळला. टेम्पोच्या धडकेने ही कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मागून आदळली तर तो कोंबड्याचा टेम्पो पुढे एका प्रवासी बसवर जोरात आदळला. तसेच दुसरी एक हुंदाईची कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आदळल्यावर ती कार मागून येणाऱ्या ट्रेलर आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या मध्ये चिरडली गेल्याने हुंदाई कारचा चालक, अन्य एकजण आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक असा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी कंपनी, डेल्टा फोर्स व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना व मृतांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर मार्गावरील अपघातग्रस्त वाहने ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.