पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
दि. १ ते २० नोहेंबर दरम्यान शाळांना दिवाळीची सुटी देण्याचा निर्णय झालेला असताना त्यात अचानक बदल करण्यात आला आहे. २८ ऑक्टोबर ते १० नोहेंबर शाळांना दिवाळीची सुटी राहील असा अचानक निर्णय घेण्यात आल्याने शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गुरूवारी दि. २८ रोजी बहुतांश शाळा भरविण्यात आल्या होत्या. हा निर्णय आल्यानंतर विद्यार्थ्यांना सुटी देत शिक्षकही घरी निघून गेले !
सध्या अनेक शाळांमध्ये परीक्षा सुरू असून अचानक सुटी जाहिर झाल्याने आता काय करायचे असा प्रश्न सबंधित शाळेच्या प्रशासनापुढे उभा राहिला आहे. शिक्षण विभागाच्या या गोंधळामुळे आगोदरच वर्ष दिड वर्षांनी सुरू झालेल्या शाळांचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे.
एक तारखेपासून सुटी असल्याने अनेकांनी इच्छित स्थळी जाण्याचे नियोजन करून ठेवले होते. बसेस, रेल्वे, विमानाच्या तिकीटांचे बुकींग करण्यात आले होते. अचानक २८ तारखेपासून सुटी जाहिर करण्यात येऊन सुटीही दहा दिवस कमी झाल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे.
सुटीमध्ये अचानक करण्यात आलेल्या बदलासंर्भात माहीती घेतली असता दि. ११ नोहेेंबर रोजी राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे ही चाचणी घेण्यात आलेली नव्हती. यंदा दि. ११ रोजी ही चाचणी होणार असल्याने बदल करण्यात आला असला तरी काही महिन्यांपूर्वीच त्यासंदर्भात शिक्षण विभागास अवगत करण्यात आले होते. तरीही शिक्षण विभागाकडून झालेल्या या गोधळाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.