पारनेरमध्ये पकडले वाटाण्याचे ६ टन बोगस बियाणे !

0
6110

पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : बियाण्यासह ट्रक जप्त

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

वाटाण्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पठार भाग तसेच लगतच्या भागातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीसाठी पारनेर येथे आणण्यात आलेले सहा टन वाटण्याचे बनावट बियाणे, बियाणे निरीक्षकांच्या पथकाने गुरूवारी रात्री पारनेर येथील डॉ. आंबेडकर चौकात रंगेहात पकडले. याप्रकरणी शुक्रवारी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी अधीक्षक कार्यालयातील गुणनियंत्रक किरण गुलाबराव मांडगे यांनी यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. खरीप हंगामात होणारा बियाण्यांचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत बियाणे निरीक्षकांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यात मांडगे यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळीबा नाथू उघडे, तालुका कृषी अधिकारी विलास रावजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दि. ३ जून रोजी मांडगे यांच्यासह उघडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयंत साळवे, किरण पिसाळ, हे दैनंदिन कामकाज करीत असताना बाळीबा उघडे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार सायंकाळी सात वाजता डॉ. आंबेडकर चौकात एक संशयास्पद ट्रक उभा होता.

मिळालेल्या माहीतीनुसार हे पथक पारनेर शहरातील आंबेडकर चौकात पोहचले असता तेथे यु पी ९२ टी ८१४९ हा ट्रक आढळून आला. पथकाने ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये पटेल सिडस् कॉर्पोरेशन, जालौन, उत्तरप्रदेश या कंपनीचे ६ टन बनावट वाटाण्याचे बियाणे आढळून आले. ४० किलो वजनाच्या १५० बॅग असलेल्या या बोगस वाटाण्याची किंमत ६ लाख रूपये इतकी आहे. पथकाने ट्रकचालकाचेे नाव विचारले असता त्याने सांगण्यास नकार दिला. पथकाने बनावट बियाण्यांसह ट्रक ताब्यात घेऊन पारनेर पोलीस ठाण्यात नेऊन लावण्यात आला.


दि. ४ जून रोजी पंचनामा करण्यात येऊन २ गोण्या तपासणीसाठी तर उर्वरीत गोण्या कृषी विभागाने जप्त केल्या. बोगस बियाणे वाहतूक करणारा ट्रक पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात ट्रकच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बियाणे खरेदी करणारा व्यापारी कोण ?

पारनेर शहरात बनावट बियाणे मागविणारा व्यापारी कोण हा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला आहे. बनावट बियाणे असलेला ट्रक तसेच बियाणे जप्त करण्यात आले असले तरी ट्रकचालकाने आपले नावही सांगण्यास नकार दिल्याने बनावट बियाणे विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता निर्माण झाली असून पारनेर पोलिसांनी ट्रकचालकाकडून त्याच्या नावासह हे बियाणे विक्रीसाठी मागविणाऱ्या व्यापाऱ्याचा पर्दाफाश करण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here