पारनेरमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट, १०० ऑक्सिजन बेडची सुविधा

0
2000

आ. नीलेश लंके यांची माहीती

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभुमिवर पारनेरमधील ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीस सुरूवात झाली असून तेथेच ऑक्सिजनचे १०० बेड असलेली सुविधा तसेच आणखी एक अ‍ॅब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर विशेषतः पारनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या बरोबरीने विविध उपाय योजना राबविण्यात आल्याचे सांगून यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, तालुक्यातील अनेक गावांमधील नागरीक नोकरी तसेच उद्योगांच्या निमित्ताने मुंबई तसेच पुण्यामध्ये मोठया संख्येने आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव या शहरामंध्ये मोठया प्रमाणात झाल्यानंतर तेथे राहणारे तालुक्यातील हजारो नागरीक गावाकडे परतले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पारनेर तालुक्यात जिल्हयात सर्वाधीक होण्याचा धोका होता. मात्र बाहेरगावांवरून आलेल्या नागरीकांची तपासणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात आल्याने कोरोनाचा मोठा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यात यश मिळविण्यात आल्याचे आ. लंके म्हणाले.

कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठीही विशेष मोहिम राबविण्यात आली. पहिल्या लाटेत कर्जुले हर्या व दुसऱ्या लाटेत सध्या भाळवणी येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले असून आजवर तेथून सहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण उपचार घेऊन परतले आहेत तर सध्या सुमारे एक हजार रूग्ण उपचार घेत आहेेत. रूग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना आवष्यक ते सर्व उपचार तालुक्यातच मिळावेत यासाठी आता पारनेरच्या ग्रामिण रूग्णालयात १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी तेथेच ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून या प्लॅन्टमधून दररोज ऑक्सिजनचे १२५ सिलेंडर उपलब्ध होणार आहेत. या प्लॅन्टसाठी १७ लाख रूपये किमतीचे जनरेटरही बसविण्यात येणार आहे. रूग्णांसाठी आणखी एक रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आ. लंके म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत सुविधेअभावी रूग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही ते म्हणाले.

पारनेरला गॅस दाहीनी

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनंत अडचणी येत असून त्यावर मात करण्यासाठी पारनेर शहरातील स्मशानभुमित अधुनिक गॅस दाहीनी उभारण्यात येत असून लवकरच तीचा वापर सुरू होईल असेही आ. लंकेे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here