आ. लंकेंचे पवारांच्या पावलावर पाऊल ! हजारेंपाठोपाठ सेवेचं नवं युग !

0
3763

आ. नीलेश लंके यांच्यावर मंत्री जयंत पाटील यांचा कौतुकाचा वर्षाव !

भाळवणी : पारनेर अपडेट मिडिया

जिथे संकट येतील तिथं धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार नीलेश लंके यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेऊन कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केल्याचे गौवरोद्गार जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासाठी पारनेर प्रसिद्ध आहे. आता निलेश लंके हे एक सेवेचं नवं युग पारनेरकारांना दाखवतील असे सांगत पाटील यांनी आ. नीलेश लंके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या १ हजार १०० बेडच्या शरद पवार आरोग्य मंदीरास पाटील यांनी शनिवारी रात्री भेट दिली. त्यावेळी राज्यातील एकमेव चांगल्या कोव्हिड सेंटरला भेट देण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबाजी तरटे, राहुल झावरे, जितेश सरडे, बापू शिर्के, अशोक घुले, राजेद्र चौधरी, चंद्रकांत मोढवे, राजेश्वरी कोठावळे, संतोष भुजबळ, दत्ता कोरडे, बाळासाहेब खिलारी, संदीप चौधरी, डॉ. बाळासाहेब कावरे, बाळासाहेब दळवी, प्रमोद गोडसे, संदीप रोहोकले, सहदेव तराळ, नंदकुमार देशमुख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री पाटील पुढे म्हणाले, आ. लंके यांच्या या आरोग्य मंदीराविषयी आजवर केवळ ऐकत होतो. येथे भेट देउन व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर ते रूग्णांची किती सेवा करीत आहे याची जाणीव झाली. आ. लंके यांचा मला, माझ्या पक्षाला अभिमान आहे. सर्व रूग्णांची सेवा करण्याचे व्रत माणूसकीच्या भावनेतून त्यांनी स्विकारले आहे. गेल्या १४ एप्रिलपासून अव्याहतपणे सेवा करण्यास त्यांनी सुरूवात केली. लोकांचा प्रतिनिधी म्हणून एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्रापुढे उभा केला आहे. आज महाराष्ट्रभर लंके यांचे नाव घेतलं जातयं ते त्यांच्या रूग्णांच्या सेवेबद्दल असल्याचे ते म्हणाले.

                                                                व्हिडिओ पहा

 

माणुसकीचं नातं जपताहेत आ. लंके !                       

एक चांगली सेवा आ. लंके यांनी सामान्य माणसाला उपलब्ध करून दिली आहे. एखाद्यास कोरोनाची बाधा झाल्याचे समजले की जवळचाही त्याच्यापासून दुर होतो. त्याची सेवा करणे तर लांबच राहिलं. त्याचा मुलगा, बहिण, भाऊ, आई, वडील हे सर्वच लांब जाताना दिसतात. अशा स्थितीत शरद पवार यांच्या नावाने कोव्हिड सेंटरची व्यवस्था आ. लंके यांनी भाळवणी येथे सुरू केली. १ हजार १०० रूग्णांची सेवा येथे उत्तमपणे सुरू आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून दुःख आणि वेदना विसरून आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वतःच्या चुलत्यांचे दुःख विसरून रूग्णांच्या दुःखासोबत राहण्याचे काम आ. लंके करीत आहेत. रूग्णांना आधार देण्याचे, माणूसकीचं नातं जपण्याचे काम करीत आहेत.

शरद पवारांचा खरा कार्यकर्ता शोभतोय !

पाटील पुढे म्हणाले, शरद पवारांचा खरा कार्यकर्ता म्हणून आ. नीलेश लंके शोभताहेत असे मला वाटते ! जिथे संकटं येतील तिथं धावून जाण्याचं काम शरद पवार नेहमी करतात. नीलेश लंके यांनी शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेउन ते कोरोना रूग्णांसाठी धावून आले आहेत. त्यांनी सामान्य रूग्णांसाठी एक चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे. येथे दाखल झालेला रूग्ण खाजगी रूग्णालयात दाखल झाला असता तर किमान पन्नास हजाराच्या बिलाशिवाय घरी आला नसता असे ते म्हणाले.

लंकेच्या मागे समाजाचा आशीर्वाद

लोक मदतीसाठी कसे पुढे येतात याची प्रचिती शरद पवार आरोग्य मंदीरात येते. एक प्रामाणिक कार्यकर्ता, नेता पुढे आला तर काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. खजुरापासून नारळापर्यंत व बिस्कीटापासून जेवणापर्यंत सर्व व्यवस्था आ. लंके यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या मागे समाजाचा आशिर्वाद उभा राहिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सरकार सज्ज

कोरोना ओसरू लागला आहे. तो लवकरच संपुष्टात येईल अशी आशा व्यक्त करतानाच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. या लाटेत लहान मुलांना बाधा होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सुसज्ज होत आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. ऑक्सिजन केंद्र उभे करणे, महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन कमी पडणार नाही याची व्यवस्था करणे, जिथे व्यवस्था होईल तेथून औषधे उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. लंके यांचे सर्वात मोठे काम !

शरद पवार आरोग्य मंदीरास २५ लाखांची औषधे भेट देण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितले. येथे ३७० रूग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन, १ हजार २० रूग्णांना ऑक्सिजनची सुविधा दिली गेली. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांसाठी वेगवेगळया संस्था काम करीत आहेत. त्यामध्ये सर्वात मोठं काम आ. लंके यांनी केले आहे. एका चांगल्या एकमेव कोव्हिड सेंंटरला भेट देण्याची संधी मला मिळाली. यात सेवाभाव आहे, दुसरा कोणता भाव नाही. अण्णा हजारे यांच्यासाठी पारनेर प्रसिद्ध आहे. नीलेश लंकेही पारनेरचे आहेत. ते आता एक नवं सेवेचं युग पारनेरकरांना दाखवितील असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

मी देखील डॉक्टर झालोय !

गेल्या वर्षभरापासून मी कोरोना रूग्णांची सेवा करतोय. हजारो रूग्णांशी संपर्क आल्याने रूग्णास काय औषधोपचार करावा लागेल याचा मलाही चांगला अनुभव आलाय. कोरोनाची व माझी दोस्ती झालीय. माझी भेट झाल्यावर रूग्ण पन्नास टक्के बरा होतो. अनुभवातून मी देखील डॉक्टर झालोय असे सांगताना सुमारे शंभर रूग्णांना आपण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याचे ते म्हणाले. मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही भाषणाची सुरूवात डॉ. नीलेश लंके अशीच केली ! औषधोपचाराबरोबरच लंके यांनी रूग्णांना मानसिक आधार देण्याचे मोठे काम केल्याचे ते म्हणाले. प्रांताधिकारी सुधाकर भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांचीही भाषणे झाली. विदयार्थी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे यांनी प्रास्ताविक केले तर अ‍ॅड. राहुल झावरे यांनी सुत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here