हिवरेबाजारप्रमाणे उपाययोजना राबवा व कोरोना हद्दपार करा

0
613
हिवरेबाजार : कोरोना उपाययोजना राबविण्यासंदर्भात पद्मश्री पोपटराव पवार यांनी पारनेर तालुक्यातील सरपंच व इतरांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.

पद्मश्री पोपटराव पवार यांचेे आवाहन

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने आता प्रशासनही कमी पडू लागले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान तसेच पाणी फाउंडेशनप्रमाणे गावानेच पुढे आले पाहिजे. गाव पुढे आले तर गाव बदलते असा आजवरचा अनुभव आहे. हिवरेबाजार ग्रामस्थांनी राबविलेल्या उपाययोजना राबवून गावाला कोरोना मुक्त करण्याचे आवाहन आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभुमिवर शुक्रवारी पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार येथून पारनेर तालुक्यातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, तलाठी, सरपंच, आरोग्य कर्मचारी आदींना व्हिडीओ कान्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने उपस्थित होते. तालुक्यातील विविध गावांचे सरपंच तसेच इतरांनी मोठया संख्येने या संवादामध्ये सहभाग नोंदविला.

पवार म्हणाले, पारनेर तालुक्यासाठी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासारखे सामाजिक भान असलेले अधिकारी मिळाले आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आता या अधिकाऱ्यांना साथ देत गावांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यावरील उपचारांची आता चर्चा नको तर प्रत्येक गावात दक्षता घेउन लोकांना सक्षम केले तर बाधितांची संख्या कमी होण्यास मदत होईल. समाजाची मानसिकता पाहिली तर लोक हतबल झाले आहेत. हतलब समाजाला मानसिक अधार देण्याची गरज आहे. पूर्वी शहरांमध्ये रूग्ण संख्या वाढत होती. आता मात्र ग्रामिण भागात मोठया संख्येने रूग्ण आढळून येत असल्याचे ते म्हणाले.

हिवरेबाजारमध्ये कोरोना रूग्ण आढळू लागल्याने ग्रामस्थांच्या चाचण्या करून उपाययोजना करण्यात आल्या. कोरोना बाधित अथवा लक्षणे असलेल्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्यात आले. विविध प्रकारच्या कामांसाठी चार पथके तयार करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, सेवा संस्था, दुध संस्थांच्या सचिवांची मदत घेण्यात आली. बाधित रूग्णांना उपचारासाठी नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. बाधित घरातील दुग्ध व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी तसेच तेथून संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी मदत केली.

गावाबाहेरून आलेल्या व्यक्तीच्या दोन्ही चाचण्या करण्यात येतात. त्या नकारात्मक आल्या तरच घरी पाठविले जाते. अथवा सक्तीने विलगीकरण करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे पवार म्हणाले. गावातील वाद दुर ठेउन सर्वजणांच्या एकत्रीत प्रयत्नांतून गावाला कोरोना मुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील प्रत्येक गावाने अशा उपाययोजना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here