अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लबाडी करणारांवर कारवाई होणार !

0
1766
तहसिलदार ज्योती देवरे यांचा इशारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बंधने पाळावीच लागतील 
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
     अत्यावश्यक सेवेतील एखादी वस्तू दुकानात ठेऊन कापड, ज्वेलरी, चप्पल, स्टेशनरी आदी दुकाणे उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.
     राज्यासह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. नागरकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानदारांनी घरपोहच डिलेव्हरी द्यावी अशी सूचना प्रशासनाने केली असून डिलीव्हरी बॉय तसेच दुकानदार व तेथील कर्मचारी यांची कोरोना चाचणी केलेली असणे बंधकारक करण्यात आले आहे. मात्र बहुतांश दुकानदार होम डिलेव्हरी देत नसल्याने अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होउन सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडत आहे.
     अनेक कापड, ज्वेलरी, चप्पल, स्टेशनरी दुकानदार दुकाने उघडी ठेवण्यासाठी दुकानाबाहेर जिवनावश्यक वस्तू ठेऊन त्या विक्रीचा बहाणा करीत आहेत. अशा दुकानदारांकडून प्रशासनाची दिशाभूल करण्यात येत असून अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा तहसिलदारांनी दिला आहे.
     गुरूवारी सकाळपासून संचारबंदीची पोलिस तसेच महसूल प्रशासनाकडून कठोर अंमलबजावणी करण्यास प्रारंभ झाला. खासगी कोचींग क्लासेस सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर कराटे क्लास घेणाऱ्या चालीकेस १० हजार रूपये दंड करण्यात आला तर विद्यार्थ्यांच्या १५ पालकांना प्रत्येकी १ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतर खासगी शिकवणी वर्ग चालकांनाही वर्ग बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणारांनाही पोलिस प्रशासनाने चाप लावला असून विनामास्क फिरणारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
     गुरूवारी विविध दुकाने तसेच भाजी विक्रेत्यांकडे मोठया प्रमाणावर गर्दी होत असल्याचे आढळून आल्याने तहसिलदार ज्योती देवरे तसेच पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी तालुक्यातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. फक्त रूग्णालये तसेच औषध  दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
परिस्थिती भिषण : नागरीकांनी काळजी घ्यावी 
     राज्यासह तालुक्यात कोरोना रूग्णांची स्थिती भिषण आहे. रूग्णांना अवश्यक इंजेक्शन, औषधे, ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा भासू लागला आहे. रूग्णालयात बेड शिल्लक नाहीत. कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू होत असून स्मशानात अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. मागील लाटेपेक्षा यंदाची लाट अतिशय भयंकर असून त्यातून वाचण्यासाठी नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार ज्योती देवरे तसेच पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले आहे.
बंधने मोडणारांची गय नाही 
     संचारबंदी लागू असतानाही अनेक नागरीक जुजबी कारण पुढे करून शहरासह तालुक्यात विनाकारण फिरत आहेत. अशा नागरीकांवर कारवाई करण्यात येत असून बंधने मोडणारांची अजिबात गय केली जाणार नाही असा इशाराही पोलिस तसेच महसूल प्रशासनाने दिला आहे.
पळवाटा शोधू नका
 दुकाने उघडी ठेवण्यासाठी, विनाकारण घराबाहेर पडण्यासाठी पळवाटा शोधता येतील मात्र कोरोना बाधितांना बेड मिळवण्यासाठी,रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन, इतर औषधे मिळवण्यासाठी,रुग्णालयांची बिले भरण्यासाठी, अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नंबर लावण्यासाठी कोणत्याही पळवाटा नाहीत याचे भान नागरिकांनी ठेवावे.शक्यतो घराबाहेर पडू नये.
ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here