गोळीबारात वाळू तस्कर ठार : पारनेर तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये  खळबळ

0
6147
शिरूर : पारनेर अपडेट मिडीया
      वाळूच्या धंद्यातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून व वाळू तस्करीतील वर्चस्वाच्या वादातून भरदिवसा करण्यात आलेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार ठार झाला.शिरूर (पुणे) तालुक्यातील टाकळी हाजी येथे सोमवारी दुपारी गोळीबाराची थरारक घटना घडली.या प्रकारामुळे शिरूर तालुक्यासह पारनेर तालुक्यातील घोडनदी काठच्या गावात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत एक तरुणही गंभीर जखमी झाला आहे.
     स्वप्निल छगन रणसिंग (वय २५,  टाकळी हाजी, ता. शिरूर) असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.अनेक गुन्ह्यांत सहभागी असल्याने स्वप्नील रणसिंगला तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तडीपारीची मुदत संपल्याने तो पुन्हा टाकळी हाजी गावात आला होता. दुपारी बाराच्या सुमारास टाकळीतील हॉटेल मळगंगा नजीक तो मित्रांसमवेत गप्पा मारत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्याशी वाद घालत थेट गोळीबार करण्यास सुरुवात  केली.
     जीव वाचविण्यासाठी स्वप्निल रणसिंग  सैरावैरा पळू लागल्यावर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून गोळ्या घातल्या. या थरारक घटनेत त्याला आठ गोळ्या लागल्या. या अंदाधूंद गोळीबारात स्वप्निल सुभाष गावडे (वय २४, टाकळी हाजी, ता. शिरूर)  गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटाला गोळी चाटून गेली असल्याचे समजते.
     वाळू धंद्यातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून व जून्या आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजवरून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून, काही संशयिंतांचे ठावठिकाणे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
     दरम्यान, या थरारानंतर टाकळी हाजीसह पारनेर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये  खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी व परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, कुठलीही अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here