नगर : पारनेर अपडेट मिडिया
नगर शहरातील दिल्लीगेट कमानीपासून जात असताना सॅन्ट्रो कार समोर येऊन उभ्या राहिलेल्या बोलेरो जीपमधील इसमाने ‘तुला पाहून घेतो’ अशी धमकी दिल्याची तक्रार यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा स्व. रेखा जरे यांचे चिरंजिव रूणाल जरे यांनी नगरमधील तोफखना पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूणाल जरे व त्यांच्या पत्नी आकांक्षा जरे हे दोघे दि. २५ रोजी रात्री १ ते १.३० च्या सुमारास त्यांच्या सॅन्ट्रो कार मधून दिल्लागेट पासून जात होते. दिल्लीगेटच्या कमानीजवळ त्यांची गाडी आली असता समोरून एक बोलेरो जिप आली व ती जरे यांच्या सॅन्ट्रो कारसमोर येउन थांबली. जिपमधून एक इसम उतरून तो सॅन्ट्रोच्या डाव्या बाजूने जवळ आला. गाडीच्या काचेवर हाताने थाप मारून तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी तो म्हणाला, थांब तुला पाहून घेतो’. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रूणाल जरे व त्यांची पत्नी आकांक्षा हे दोघेही घाबरून गेले. तेथून त्यांचे वाहन काढून ते वेगाने घटनास्थळावरून निघून गेले.
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गेल्या नोहेंबर महिन्यात नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी पत्रकार बाळ बोठे याच्यासह इतर आरोपी अद्यापही कारागृहात आहेत.