पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
येत्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी वेगवान घडमोडी घडत असून राष्ट्रवादीमधील इन्कमींग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राष्ट्रवादीतील इन्कमींगचा सर्वाधिक फटका शिवसेेनेला बसत असल्याचे दिसून येत असून रविवारी सायंकाळी शिवसेनेेला मास्टर स्ट्रोक देत काही दिग्गज उमेदवार शिवबंधन सोडून हाती घडयाळ बांधणार आहेत.
गेल्या वर्षी पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना होऊन निवडणूक जाहिर होण्याची चिन्हे असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. तेंव्हापासूनच शिवसेनेतील ठराविक दिग्गज उमेदवार आ. नीलेश लंके यांच्या संपर्कात होते. निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याने पक्षांतराच्या हालचाली थंडावल्या होत्या. करोनाचा संसर्ग ओसरू लागल्यानंतर जाहिर झालेल्या निवडणूकीसाठी राजकिय हालचालींना गेल्या तिन चार दिवसांपासून चांगलाच वेग आला असून आ. लंके यांच्यासमवेत प्रमुख दिग्गजांच्या बैठका झाल्या आहेत. नव्याने दाखल होत असलेल्या दमदार उमेदवारांसाठी राष्ट्रवादीकडून तयारी केलेल्या काही निष्ठावानांनी विनाअट माघार घेण्याची तयारी दर्शविल्याचीही माहीती आहे.
आ. लंके यांच्यासमवेत बैठका होऊन राष्ट्रवादीत सहभागी होणारे काही कार्यकर्ते स्वतः निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नसले तरी त्यांनी सर्वानुमते उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्या, त्या प्रभागातील उमेदवाराच्या नावांवर एकमतही झाल्याचे समजते. आ. नीलेश लंके हे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. ते रविवारी सायंकाळी पारनेरमध्ये पोहचणार आहेत. त्यानंतर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहीती आहे. या प्रवेशाविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून नेमके कोण प्रवेश करणार याची नावेही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र या प्रवेशांमुळे शिवसेनेच्या बलेकिल्ल्यास जबर हादरा बसणार असल्याचे बोलले जात आहे. आ. लंके यांना रविवारी पारनेरात पोहचण्यास विलंब झाल्यास हे प्रवेश सोमवारीही होऊ शकतात असे सुत्रांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बहुतांश कार्यकर्त्यांनी मतदारांचा कौल घेतला असून त्यानंतरच प्रवेशाचा निर्णय घेण्यात आल्याचीही चर्चा आहे. रविवारी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त आणखीही काही शिवसैनिक प्रवेशासाठी उत्सुक आहेत, परंतू त्यांना हव्या असलेल्या प्रभागात पूर्वीच उमेदवार निश्चित झाल्याने त्यांचा मार्ग मात्र खुुंटला आहे. तरीही पूर्वीच्या इच्छुकांची मनधरणी संभाव्य इच्छुकांनी सुरू केली असून त्यात यश आल्यास प्रवेश करणारांची संख्या वाढू शकते असे सांगण्यात आले.