राजाराम शेळके हत्याकांड : इतर आरोपींच्या शोधात सुपे पोलिस
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
नारायणगव्हाणचा माजी सरपंच, तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्येचा सुत्रधार राजाराम शेळके याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पारनेर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधिश कनिष्ठ स्तर डी आर बडवे यांनी ९ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी दिले.
नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या राजाराम शेळके व त्याचा मुलगा राहूल यास न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वर्षभरापूर्वी अर्जित रजा मंजुर केली होती. शुक्रवारी राजाराम शेळके शेतामध्ये शेततळयाच्या कामाच्या सुचना देऊन शेतामधीलच घरातकडे निघाला असता अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून निर्घृन हत्या केली. त्यात राजाराम याचा जागीच मृत्यू झाला.
राजाराम शेळके याचा मुलगा राहूल याने सुपे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगव्हाणचा उपसरपंच राजेश शेळके, प्रकाश कांडेकर यांचा भाऊ इंद्रभान कांडेकर, मुलगा संग्राम कांडेकर व अनिकेत कांडेकर यांच्यासह गणेश भानुदास शेळके, भुषण प्रकाश कांडेकर, सौरभ इंद्रभान कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर यांच्याविरोधात कट करून राजाराम शेळके याची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुपे पोलिसांनी राजेश शेळके, इंद्रभान कांडेकर, संग्राम कांडेकर व अनिकेत कांडेकर यांना रात्रीच अटक केली. उर्वरीत आरोपी फरार आहेत.
चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी पारनेरच्या न्यायालयापुढेे उभे केले असता तपासी अधिकारी सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांनी आरोपींना पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपींनी पूर्व वैमनस्यातून राजाराम शेळके याची हत्या घडवून आणली आहे. हत्येचा कट कोठे रचला ? त्यासाठी कोणाला सुपारी दिली होती ? याची चौकशी करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडीचे मागणी केली. गुन्हयात वापरलेले हत्यार ताब्यात घ्यायचे आहे, कटाविषयी चौकशी करायची आहे, इतर आरोपींना अटक करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी गोकावे यांनी केली.
आरोपींच्या वतीने अॅड गणेश कावरे यांनी खूनाची घटना घडून १२ वर्षे होउन गेलेले आहेत. सन २०१८ साली राजाराम शेळके व त्यांचा मुलगा पॅरोलवर नारायणगव्हाणमध्ये येउन गेलेले आहेत. त्यावेळी कोणतेही वाद झालेले नाहीत. फिर्यादीने आरोपींनी वारंवार धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमुद केलेले आहे, मात्र तशा पद्धतीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचे काही वादच झालेले नाहीत. केवळ पूर्ववैमनस्यातून आरोपींना या गुन्हयात गोवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. घटना घडली त्यावेळी यातील आरोपी राजेश शेळके हा पुण्यात होता. इतरही आरोपी घटनास्थळी नव्हते. त्यामुळे पोलिस कोठडी देउ नये अशी मागणी अरोपींचे वकील अॅड. गणेश कावरे यांनी मांडली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना २१ जुनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये पोलिसांनी सर्व तपास पुर्ण करावा, त्यासाठीच ९ दिवसांची कोठडी दिल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सबंधित बातम्या वाचा
उपसरपंच राजेश शेळकेसह कांडेकरांचा भाऊ व दोन मुले अटकेत !
कांडेकरांचा मारेकरी राजाराम शेळकेची हत्या !