आमदार नीलेश लंके : भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे स्थलांतर व खावटी वितरण कार्यक्रम
सुपे : पारनेर अपडेट मिडिया
व्यवसायाच्या बाबतीत सुप्यात पवारांचा कोणी हात धरायचा नाही ! त्यांच्या आडनावातच पॉवर आहे ! पवार म्हणजे पॉवर, त्यांच्या हाती देशाच्या चाव्या आहेत ! त्यांच्या आडनावांतच दम असल्याचे सांगत आमदार नीलेश लंके यांनी भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या स्थलांतर कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.
उद्योजक भास्कर पवार व नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखालील भाग्यक्ष्मी पतसंस्थेच्या स्थलांतर तसेच आदीवासी खावटी योजनेच्या वितरणाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. संस्थेच्या अध्यक्षा ताराबाई पवार, उपाध्यक्षा आशा पिपाडा, भास्करराव पवार, नामदेवराव पवार, विक्रमसिंह कळमकर, राजूशेठ शेख, सचिन पठारे, हानिफभाई शेख, अॅड. बाळासाहेब पवार, दिलीप पिपाडा, माजी सरपंच विजय पवार, किरण पवार, संदीप मगर, दिपक पवार, राजेश्वरी कोठावळे, नितिनकुमार गोकावे, दिपक लंके, बाळासाहेब दळवी, राजेंद्र शिंदे, शरद पवार, भाउसाहेब भोगाडे, संदीप शिंदे यांच्यासह सुपे परिसरातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, कोणत्याही कार्यालयात पवारांची फाईल गेली की लगेच मंजुर ! आम्हालाही बरोबर घेऊन चला ! पवारांकडे दातृत्व आहे, ते कोणाकडे नाही. नामदेव पवार, दिपक पवार यांच्याकडून व्यवसाय कसा करावा हे शिकले पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा फायदा महालक्ष्मी पतसंस्था चालविता होत आहे. महिला किती आदर्श काम करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाग्यलक्ष्मी पतसंस्था असल्याचे सांगत आ. लंके पुढे म्हणाले, भास्कराव पवार, नामदेव पवार यांनाही ही संस्था चालविताना ताराबाई पवार यांनी हस्तक्षेप करू दिला नाही. काही वर्षांपूर्वी त्यांंनी या संस्थेचे त्यांनी छोटेसे रोपटे लावले. त्यावेळी दुर्गम भाग असतानाही महिलांकडून पन्नास, शंभर रूपये संकलीत करून संस्था सुरू करण्यात आली. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे, याचा अभिमान आहे. संस्था चालविणे तारेवरची कसरत असते. संस्थेचे व्यवस्थापक जालींदर शिंदे हे अतिशय चांगले व्यवस्थापन करीत आहेत. गोरगरीबांच्या पैशांचे रक्षण करीत आहेत.
पुढाऱ्यांच्या संस्थांवर अजिबात विश्वास ठेवू नका !
पुढाऱ्यांच्या संस्थांवर तर अजिबात विश्वास ठेऊ नये ! अशी मिश्किली करताना ते म्हणाले, माझ्या ताब्यात हजार दोन हजार कोटींची संस्था दिली व आठ दिवसांनी चौकशी केली तर त्यात एक रूपया देखील शिल्लक राहिलेला नसेल ! पुढाऱ्यांचं अवघड असतं. मला अनेक वेळा पतसंस्थेत, बँकेत संचालक होण्याचा आग्रह धरला जातो. मात्र जिथे आर्थिक व्यवहार आहेे ते सोडून मला सांगा असे मी नम्रपणे उत्तर देतो. आर्थिक संस्थेत माझा हस्तक्षेप सुद्धा नको ! मी एखाद्या संस्थेचा संचालक झालो तर हा गरीब आहे, याला कर्ज देउन टाका असे मी सांगून टाकेल. कारण आमच्या नजरेत तो रडला की गरीबच दिसतो असे ते म्हणाले.
अधिकारी व जनतेमधील लोकप्रतिनिधी दुवा !
लोकप्रतिनिधी व कार्यकर्ता हा अधिकारी व जनतेमधील दुवा असतो. शासनाच्या योजना शेवटच्या घटाकांपर्यत पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधीचे, कार्यकर्त्याचे असते. खावटी योजनेसंंदर्भात शासनाचा निर्णय झाल्यानंतर तालुकास्तरावर यंत्रणा उभी करण्यात आली. त्यामुळे इतक्या मोठया प्रमाणावर आदीवासी जनतेला लाभ मिळू शकला. अधिकारी योजना राबवितात मात्र खाली चांगली फळी नसेल तर ती योजना सक्षमपणे राबविली जाऊ शकत नाही. त्यामुळेच ही योजना राबविताना आपण मध्यस्ताचं काम केल्याचे आ. लंके म्हणाले.
गोरगरिबांचे अनुदान लुबाडण्याचा धंदा !
आदीवासी बांधवांना पन्नास लाख रूपयांचा फायदा झाला. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रूपये जमाही झाले. हे पैसे जमा झाले की नाही याची विचारणा आदीवासी बांधवांकडे करून यामध्ये उधारी वगैरे काही नसते. एखादा लोकप्रतिनिधी म्हणाला असता तुमचे दोन हजार रूपये मंजुर केले, पाचशे मला द्या ! असा धंदा यापूर्वी तालुक्यात चालला होता असे सांगत आ. लंके यांनी विरोधकांना टोला लगावला.
मी सगळं पांडुरंग चरणी अर्पण केलंय !
मी आपलं सगळं पांडूरंग चरणी अर्पण केलेलं आहे. त्यामुळे मला काहीच स्वार्थ राहिलेला नाही कशाचा. आपल्याला दोन रूपये कमवायचे नाहीत. कोणाच्या संपत्तीवर डोळा ठेवायचा नाही. आपलं फक्त गोरगरीबांच्या डोळयातील आश्रू पुसले गेले पाहिजेच हेच एकमेव ध्येय असल्याचे आ. लंके म्हणाले.
आदिवासी बांधव माझ्या कुटुंबातले
आदीवासी बांधव माझ्या कुटूंबातील आहेत. त्यांची काळजी मला असणार नाही मग कोणाला असेल असा सवाल करून आदीवासींच्या घरकुलासह शबरी, ठक्करबप्पा आदी आदीवासींच्या योजना येत्या काळात सक्षमपणे राबवून आदीवासी बांधवांना समाजाच्या प्रवाहाबरोबर आणण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.