पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
मुळा नदीवरील पिंपळगांवखांड धारणाचे आवर्तन पुर्ण दाबाने सोडून पारनेर तालुक्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रासह संगमनेर तालुक्यातील काही गावे ओलिताखाली येण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार नीलेश लंके यांनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील पोखरी, वारणवाडी, म्हसोबाझाप, पळसपूर, मांडवेखुर्द, देसवडे या गावांना मुळा नदीवरील पिंपळगांव खांड धरणाचे आवर्तन पुर्ण दाबाने मिळत नाही. ते पुर्ण दाबाने मिळाल्यास या भागातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्राबरोबरच संगमनेर तालुक्यातील काही गावे ओलिताखाली येणार आहेेत. हे आवर्तन पुर्ण दाबाने सोडण्याच्या मागणीसाठी म्हसोबा झाप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश गाजरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आ. नीलेश लंके यांची भेट घेत निवेदन सादर केले होते.
ग्रामस्थांच्या निवेदनानंतर आ. लंके यांनी त्यांच्या नगर येथील संपर्क कार्यालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवून हे आवर्तन पुर्ण दाबाने कसे मिळविता येईल याबाबत तांत्रीक माहीती जाणून घेतली. लवकरच आ. लंके हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेउन हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. पुर्ण दाबाने पाणी कसे सोडता येईल त्यासबंधिचा एक आराखडा तयार करण्यात आला असून तो मंत्री पाटील यांना सादर करण्यात येणार आहे.
सरपंच प्रकाश गाजरे यांच्या नेतृत्वाखाली आ. लंके यांना भेटलेल्या शिष्टमंडळात गणेश शिंदे, जयराम आहेर, बाबुराव आहेर, अर्जुन पिंगळे, बाळासाहेब शिंदे, योगेश पवार, नामदेव करंजेकर, अशोक आहेर, साहेबराव करंजेकर आदींचा समावेश होता.
आ. लंके यांच्यामुळे जिव्हाळयाचा प्रश्न मार्गी लागणार !
पिंपळगांवखांंड धरणाच्या पाण्याचा वर्षानुवर्षांचा जिव्हाळयाच्या प्रश्न आ. नीलेश लंके यांनी पुढाकार घेतल्याने मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी विडा उचलला असून अलिकडेच त्यांनी कुकडी प्रकल्पातून पारनेर तालुक्यासाठी राबवायच्या संभाव्य योजनांसदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा केली होती. या बैठकीत काही प्रश्न मार्गी लागले तर येत्या काही दिवसांत उर्वरीत प्रश्नांचीही उकल होईल. आता मुळा खोऱ्यातील पाण्याचा हा प्रश्नही धसास लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून तो मार्गी लागल्यास आमची शेती समृद्ध होणार आहे.
प्रकाश गाजरे
सरपंच : म्हसोबा झाप