कोल्हापूर : पारनेर अपडेट मिडिया
करोना काळात रूग्णांसाठी केलेल्या कामामुळे जगभर प्रसिध्दी पावलेले आमदार नीलेश लंके हे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी ते शेकडो स्थानिक कार्यकर्त्यांसह कोल्हापूर जिल्हा बँकेत पोहचले आणि बँक परीसरासास अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले !
आ. लंके यांच्या या लोकसंग्रहाची तेथील स्थानिक वर्तमानपत्रांनी दखल घेतली आहे. विधानपरीषद निवडणूकीत सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबददल आ. लंकेे हे जिल्हा बँकेत त्यांचा सत्कार करण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी बँकेत जिल्हा बँकेच्या निवडणूकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक सुरू होती. या बैठकीत विविध मतदारसंघ कसे बिनविरोध करायचे याबाबत विचारमंथन सुरू होते. निवडणूकीची रणनिती असल्याने जिल्हा बँकेत मोजकेच नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.आ.लंके यांनी सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जिल्हा बँकेतच भेटीसाठी येण्याचा निरोप पाटील यांनी दिला.
पाटील यांच्या निरोपानंतर आ. लंके यांच्यासमवेतच्या फौजफाट्यासह जिल्हा बॅकेत पोहचले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मोठया संख्येमुळे तेथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. कोल्हापूर परिसरात आ. लंके यांना माणणारा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय पारनेर शहरातील अनेक नागरीक व्यवसायानिमित्त तेथे स्थायीक झालेले आहेत. आ. लंके यांच्या दौऱ्याची माहीती समजल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून या कार्यकर्त्यांचा आ. लंके यांच्या भोवती गराडा आहे. विविध कार्यक्रमादरम्यान हे कार्यकर्तेही आ. लंके यांच्या समवेत उपस्थित असतात. आ.लंके यांच्यासमवेत असलेल्या या कार्यकर्त्यांच्या मोठया संख्येची तेथील माध्यमांनी दखल घेतली आहे.
दरम्यान, आ.लंके हे जिल्हा बँकेत पोहचले त्यावेळी तेथे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय महाडीक, आमदार पी एन पाटील, विनय कोरे, भैय्या माने, बाबासाहेब पाटील आर्सुलेकर हे उपस्थित होते. आ. लंके यांनी मंत्री सतेज पाटील यांचा सत्कार केल्यानंतर ते कार्यकर्त्यांसह तेथून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. कोल्हापूर बँकेच्या वतीनेही आ. लंके यांचा सन्मान करण्यात आला.