ठाणे : पारनेर अपडेट मिडिया
दसरा मेळाव्यात भाजप विरोधाचे प्रवचन पक्षप्रमुख मुख्यमंत्र्यांनी झोडल्यानंतरही शिवसेनेत मात्र पक्षांतर्गत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत! त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, बाप बापच असतो’ या आशयाचा मजकूर असलेला बॅनर ठाण्यात लावण्यात आला आहे. बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो असल्याने रामदास कदम यांच्या समर्थकांकडून सेनेतील कुणाला टार्गेट केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाण्यातील विठोबा कदम आणि रवि आमले या दोघा कट्टर समर्थकांनी ही बॅनरबाजी करून एकप्रकारे सेना नेतृत्वालाच आव्हान दिले असून राडा झाल्यावर फोन करणारे सेनेतील सुपारीबाज कोण? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अडचणीत आलेले राज्याचे परिवहनमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना रसद पुरवल्याचा आरोप शिवसेनानेते रामदास कदम यांच्यावर होत आहे. ‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपमुळे उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवल्याने दसरा मेळाव्यामध्येही कदम यांची अनुपस्थिती होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर नसल्याचे कारण देऊन कदम यांनी दसरा मेळावा टाळल्यानंतर रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाणे शहरात बॅनर झळकावण्यात आले आहेत. ‘कोकणचा ढाण्या वाघ’ असा उल्लेख करून बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून ठाण्यात चर्चेला उधाण आले आहे. यामध्ये उल्लेख केलेले राडा झाल्यानंतर फोन करणारे आणि सुपारी देणारी मंडळी नेमकी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा बॅनर नेमका कोणाला उद्देशून लिहिण्यात आला आहे? याबद्दलही उत्सकताही निर्माण झाले आहे.