पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
तालुक्यातील वडगाव गुंड येथील सुपात्या डोंगरावरील वनराईला जोडणाऱ्या रस्त्यावर लोकसहभागातून हरीत बोगदा (ग्रीन टनेल) आकार घेत आहे.भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व लोकजागृती सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने एक किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वडाच्या झाडांचे रोपण करण्यात येत आहे.पहिल्या टप्प्यातील सहा फूट उंचीच्या १०० रोपांची लागवड सध्या सुरू आहे.एकूण १५० वटवृक्षांच्या लागवडीतून, झाडांच्या वाढीनुसार फांद्यांना विशीष्ट आकार देऊन हरीत बोगदा साकारण्यात येणार आहे.येत्या दहा वर्षांत हरीत बोगदा आकार घेईल.त्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व लोकजागृती या संस्थांनी दीड वर्षांपूर्वी सुपात्या डोंगरावरील २४ एकर गायरान जमिनीवर वनराई फुलवण्याचा निर्णय घेतला.या गायरानावर आत्तापर्यंत १७३ प्रजातींच्या सुमारे १ हजार ७०० औषधी वनस्पती,फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.वनराईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छोटे तलाव तयार करून त्यात कमळाचे वेल वाढवण्यात आले आहेत.वनखात्याने वन्यजीव व पक्षांसाठी पाच उथळ पाणवठे तयार केले आहेत.
वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धनाची काळजी घेण्यात येत आहे.वनराईची पाण्याची गरज भागवण्यासाठी कुकडी कालव्यापासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यात आले आहे.पायथ्याशी एक लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले आहे.या शेततळ्यातून १० अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीच्या सहाय्याने ठिबक सिंचनाद्वारे डोंगरावरील झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रत्येकी पाच एकरांचे विभाग करण्यात आले आहेत.एका वेळी पाच एकर क्षेत्रावरील झाडांना पाणी देण्यात येते.देखभालीसाठी दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे वर्षभरात झाडांची चांगली वाढ झाली आहे.
चारशे मिटर उंचीची उभी चढण असणाऱ्या डोंगरावर जाण्यासाठी घाटरस्ता तयार करण्यात आला आहे.डोंगरावर सकाळी, संध्याकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून दोन किलोमीटर लांबीची धावपट्टी (जॉगिंग ट्रॅक) तयार करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांवर १७ लाख खर्च
सुपात्या डोंगरावर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करण्यासाठी तसेच त्यासाठी लागणाऱ्या शेततळे, जलवाहिनी, विद्युत मोटार,ठिबक सिंचन, घाटरस्ता आदी पायाभूत सुविधांसाठी आत्तापर्यंत सुमारे १७ लाख रुपये खर्च झाले आहेत.नागरिकांनी त्यासाठी वस्तुरूपाने मदत केली आहे.
पर्यटकांना पर्वणी
सुपात्या डोंगरापासून जवळ असलेल्या, तालुक्यातील निघोज (कुंड) येथील जागतिक दर्जाचे रांजण खळगे,तसेच राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले निघोज येतील मळगंगा देवस्थान येथे नेहमीच पर्यटकांची,भाविकांची वर्दळ असते.पर्यटकांसाठी सुपात्या डोंगरावरील वनराई व हरीत बोगदा आकर्षण ठरणार आहे.