मुंबई : पारनेर अपडेट मिडिया
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 वरून 8 करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (Maharashtra DGP Sanjay Pandey) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
‘महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार’, असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.