बाळ बोठेच्या पोलीस कोठडीत २५ मार्चपर्यंत वाढ
पारनेर : पारनेर अपडेट मिडीया
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत दोन दिवस, २५ मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधिश उमा बो-हाडे यांनी मंगळवारी दिले. दरम्यान, जरे यांच्या हत्येपूर्वी व हत्येनंतर बोठे यास कोणी मदत केली याचा पोलिस शोध घेत असल्याचे तपासी अधिकारी अजित पाटील यांनी न्यायालयात सांगितले.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बोठे यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले.रेखा जरे हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी करताना तपासी अधिकारी अजित पाटील यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. घटनेनंतर हैदराबादला फरार होण्यापूर्वी बोठे नगरमध्ये कोठे रहात होता.या काळात त्याला कोणी आर्थिक मदत केली,कोणी आश्रय दिला.नगरमध्ये असताना बोठे कोणाच्या संपर्कात होता या बाबींचा तपास करणे बाकी असल्याने बोठेच्या पोलीस कोठडीत वाढ करावी अशी मागणी अजित पाटील यांनी न्यायालयात केली.
रेखा जरे यांच्या हत्येसाठी १२ लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असले तरी पैश्यांव्यतिरिक्त आणखी काही आमिष बोठेने इतर आरोपींना दाखवले होते का याची चौकशी आरोपी बोठेकडे करणे बाकी आहे.बोठे हैदराबादला कसा व कोणत्या मार्गाने गेला याची माहिती अद्याप बोठेने दिलेली नाही.त्याबाबत तपास करणे आवश्यक आहे.त्यासाठी बोठेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती तपासी अधिकारी पाटील यांनी न्यायालयात केली.
या प्रकरणातील हैदराबाद येथील आरोपी पी.अनंतलक्ष्मी व्यंकटाचारी सुब्बाचारी अद्याप फरार आहे.या महिला आरोपीने बोठेला काय मदत केली याची माहिती घेणे तपासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. सागर भिंगारदिवे याच्यासह इतर आरोपींनी बोठेला नेमक्या कश्या पद्धतीने मदत केली याची माहिती बोठेकडून घेणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने बोठेला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी पाटील यांनी न्यायालयात केली.सरकरी वकील मनिषा डुबे यांनी तपासात झालेल्या प्रगतीची माहिती न्यायालयात दिली.
आरोपी बोठेच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना वकील महेश तवले यांनी बोठेच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवण्यास विरोध केला.आरोपी बोठे बारा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे.या कालावधीत बोठेने पोलीसांना तपासात पूर्ण सहकार्य केले आहे.त्यामुळेच तपासात प्रगती होऊ शकली.इतर आरोपींनी बोठेला काय मदत केली याची माहितीही त्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.हैदराबाद येथील फरार आरोपी पी.अनंतलक्ष्मी व्यकंटाचारी सुब्बाराव हिने आरोपीला नेमकी काय मदत केली याची माहिती ती स्वत: देऊ शकेल. त्यासाठी बोठेच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही.त्यामुळे बोठेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी अशी मागणी वकील तवले यांनी केली.दोनही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश उमा बो-हाडे यांनी आरोपी बोठेला दोन दिवस,२५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कोतवाली पोलीसही न्यायालयात हजर
कोतवाली (नगर) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर मोठ्या फौजफाट्यासह न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. बोठे याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात पाच ते सहा गुन्हे दाखल असून बोठे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.कोतवाली पोलिसांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर बोठे याचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.