नवी दिल्ली : पारनेर अपडेट मिडिया
जगातील सर्वात मोठ्या करोना लसीकरणास भारतात १६ जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, करोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता.
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी २५० रुपये मोजावे लागत आहेत. सरकारने आता ही किंमत २०० रुपयांवर आणली आहे.
लसीकरणाच्या नियमात बदल
देशात करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना करोना लस देण्यात येत आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. कोव्हिशिल्ड लशीचा दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा महत्वाचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत.
कोरोना लशीच्या दोन डोसमध्ये सध्या चार आठवड्यांचे अंतर आहे. म्हणजेच लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. आता केंद्र सरकारने हा कालावधी ६ ते ८ आठवडे केला आहे. कोव्हिशिल्ड ही लस ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केली असून, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तिचे उत्पादन करीत आहे.
समोर आलेल्या शास्त्रीय पुराव्यानुसार कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता वाढवून ६ ते ८ आठवडे करण्यात आले आहे. मात्र, दुसरा डोस आठ आठवड्यांनंतर घेऊ नये, असा सावधगिरीचा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिन या लशीच्या दोन डोसमधील अंतर बदलण्यात आले नसून, ते चार आठवडेच राहील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या करोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते