पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
‘मी माझ्या मुलाचा शिक्षक’ या भावनेतून पालकांनी मुलांना अभ्यासात मदत केली तर त्यांना शिकण्यात रस निर्माण होईल,मुले भरकटणार नाहीत असे प्रतिपादन पारनेर पब्लिक स्कूलचे प्राचार्य गीताराम म्हस्के यांनी केले.
पारनेर पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन दूरसंवाद पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य म्हस्के बोलत होते.करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर सध्या दूरसंवाद पध्दतीने वर्ग सुरू आहेत.केवळ भ्रमणध्वनी, इंटरनेट डाटा, तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले म्हणजे पालकांची जबाबदारी संपत नाही.मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले नाही तर मुले भरकटण्याची शक्यता जास्त असते.तासिकांना शिकवलेले मुले योग्य पध्दतीने शिकतात का,दिलेले गृहकार्य वेळेवर करतात का हे पालकांनी पाहिले तर मुले शिकतील.सध्याच्या कठीण काळात आपणच मुलांचे शिक्षक आहोत अशी खुणगाठ प्रत्येक पालकाने बांधली पाहिजे असे प्राचार्य म्हस्के म्हणाले.
प्राचार्य इंद्रभान डांगे,पारनेरकर महाराज, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या उपस्थितीत २१ वर्षांपूर्वी विद्यालयाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, विविध खेळाच्या स्पर्धा, शालेय निकाल, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांमध्ये चांगले यश मिळवले. आयसर,नायसर यासारख्या संशोधनपर संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळाल्याने विद्यालयाचा शैक्षणिक आलेख उंचावला. जिल्ह्यात एक आदर्श शाळा म्हणून पारनेर पब्लिक स्कूलमध्ये नावलौकिक मिळविला असल्याचे प्राचार्य म्हस्के म्हणाले.
हे विद्यालय पुढे जात असताना अनेक पालकांचे देखील विशेष सहकार्य लाभले. याच सहकार्याच्या बळावर विद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षापासून इ.१ली ते ५वी साठी स्टेट बोर्डाबरोबरच CBSE ची नवीन तुकडी व ११वी १२वीसाठी सच्चिदानंद कला क्रीडा करीअर इन्स्टिट्यूट नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला व चालू शैक्षणिक वर्षी ऑनलाईन विद्यालय सुरु करण्याचेही ठरविले .
संस्थेच्या संस्थापिका सविता म्हस्के, सहशिक्षक भालेकर, नांगरे,बेलोटे,पाचारणे,पवार,योगेश पिसे,भुकन, औटी ,कानवडे,गीद उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले तर आभार काकडे यांनी मानले.