देवस्थानच्या जमिनीचा वाद : आरोपी हत्यारासह जेरबंद
कर्जत : पारनेर अपडेट मिडिया
देवस्थानची जमीन नावावर करण्याच्या वादातुन कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर गोळीबाराचा थरार झाला ! संदीप छगन मांडगे याने रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार करीत भावकीवर दहशत निर्माण केली. घटनेनंतर पोलिसांनी प्रांत कार्यालयाच्या दिशेने धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या संदीप मांडगे यास अटक केली.
याबाबत भरत नामदेव मांडगे (४५, धंदा शेती, रा. रेहकुरी, ता. कर्जत) याने कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमीन गट नं. ७०, ७१, ७२, ७३ मध्ये एकूण ७५ एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र अनेक वर्षांपासून मांडगे भावकीतील चार कुटुंबे कसत होते. कोकनाथ महादेव मंदिराची सर्वजण देखभाल करीत होते. भावकीतील संदीप छगन मांडगे याने वरील चारही शेत गटाची देवस्थानाच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याच्या घरातील त्यात अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. संदीप छगन मांडगे याने दुसऱ्या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही त्यामुळे इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी कर्जत येथील उपविभागीय अधिकारी यांचेकडे दावा दाखल केलेला आहे.
दि.३० डिसेंबर रोजी उप विभागीय अधिकारी, कर्जत येथे या प्रकरणाची तारीख असल्याने फिर्यादी व भावकीतील इतर लोक तारखेस उपस्थित होते. सुनावणी झाल्यावर शांतीलाल बाबू मांडगे ( ६०) रोहीदास खंडू मांडगे (७५), शहाजी बाबू मांडगे (५५) आश्रू यशवंत मांडगे (७०), भानुदास यशवंत मांडगे (८०), हारीभाऊ आन्ना मांडगे (५५), नारायण देवीदास मांडगे (५०), आप्पा गंगाराम मांडगे (५५), धनराज खंडू मांडगे (५०) (सर्व रा. रेहकुरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हे सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेले होते. त्यावेळी संदीप मांडगे, सचिन मांडगे तेथे आले. त्यावेळी शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटरसायकल मला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने फिर्यादी सदर मोटरसायकल घेवून घरी निघाले होते. त्याचवेळी संदीप छगन मांडगे याने, तू मोटरसायकल घेवून जावू नको, खाली उतर असे म्हणून शिवीगाळ केली. दमदाटी करून मारहाण केली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट झाली. या दरम्यान संदीप मांडगे याने त्याच्या कंबरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून हवेत गोळीबार केला. त्यानतंर संदीप मांडगे हा तेथून निघून गेला.
याबाबत माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले. याबाबत इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. रिव्हॉल्वर आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.