पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
हिंदू धर्मशास्त्रात वर्षातील बारा महिन्यांपेक्षा कार्तिक महिन्याला अधिक महत्व असून दिवाळी सणामुळे हा महिना अधिक लोकभिमुख झाला आहे. संपूर्ण महिन्याला देवांनीही अनन्यसाधारण महत्व दिले असून या महिन्यातील कार्तिक पौर्णिमेच्या पर्वामध्ये कार्तिक स्वामींचा दर्शन योगही लाभदायक माणला जातो. त्यामुळे दरवर्षी पारनेर येथील कार्तीक स्वामी मंदीरात राज्यभरातील हजारो भविक हजेरी लावून कार्तीक स्वामींच्या दर्शनाची पर्वणी साधतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी उत्तर रात्रीपासून म्हणजेच शुक्रवार दि. १९ नोहेंबर रोजी पहाटे १ वाजून २९ मिनिटांपासून शुक्रवारी दुपारी २ वाजून २८ मिनिटांपर्यंत कार्तीक स्वामींच्या दर्शनाचा योग असून त्यानिमित्तान पारनेर तसेच बुगेवाडीच्या नागरीकांनी उत्सवाची तयारी केली आहे. पारनेर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दत्ताशेठ कोंडीबा कुलट यांच्या हस्ते कार्तिक स्वामी दर्शन उत्सवानिमित्त श्री कार्तिक स्वामींना महाभिषेक करण्यात येऊन या उत्सवास प्रारंभ होईल. कुलट यांच्या वतीने उत्सवादरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पारनेर शहरात पारनेर – जामगांव रस्त्यावर सोमठाण खंडोबा मंदीराशेजारी कार्तिक स्वामींचे मंदीर आहे. भारतात ठराविक असलेल्या कार्तिक स्वामींच्या मंदीरांपैकी एक असलेले हे पुरातन मंदीर असून कार्तिक महिन्याच्या पर्वणीला कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास त्या व्यक्तीची आर्थिक उन्नती होते अशी अख्यायीका आहे. कार्तिक स्वामींच्या मंदीरात महिलांना प्रवेश नसतो. या पर्वात मात्र महिलांनाही मंदीरात जाउन कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची मुभा असते. त्यामुळे या दर्शन पर्वात दर्शन घेण्यासाठी महिलांचीही मंदीर परीसरात मोठी गर्दी असते.
या दर्शन पर्वणीचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.