पानोली : पारनेर अपडेट मिडिया
गुरूमाऊली पोटच्या मुलाप्रमाणे सर्वांवर प्रेम करतात. म्हणून आपण त्यांना गुरूमाऊली संबोधतो. त्यांचे सांगणे आहे की सेवेकऱ्यांनी सहनशिलता, सोशिकता, नम्रता, माधुर्ययुक्त संवाद आदी मुल्यांची जपवणूक केली पाहिजे. अन्यथा कितीही गुरूचरित्र वाचा, कितीही होम हवन करा, कितीही माळा जपा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा संदेश त्रंबकेश्वर, (नाशिक) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे गुरूवर्य, गुरूपुत्र चंद्रकांत दादासाहेब मोरे यांनी दिला.
पानोली येथे बुधवार दि. १७ नोहेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अध्यात्मिक महासत्संग, गुरूदर्शन सोहळा, जनकल्याण मेळावा व प्रशासकिय दौऱ्यानिमित्त गुरूवर्य चंद्रकांत मोरे यांनी सेवेकऱ्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार नीलेश लंके, अशोक सावंत, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, सुरेश धुरपते, सुरेश पठारे, जितेश सरडे आदी यावेळी उपस्थित होते. रामराव गाडेकर यांनी प्रास्ताविक, विरेंद्र परदेशी व काशीनाथ फंड यांनी सूत्रसंचलन तर विनोद उदार याने आभार मानले.
यावेळी संवाद साधताना गुरुवर्य चंद्रकांत मोरे म्हणाले, सेवेकरी म्हटला की तो नम्र असला पाहिजे. त्याने कोणाचेही मन दुखावता कामा नये. मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ अशा भेदाभेदाच्या भिंती त्याने तयार करू नयेत. जातीवाचक बोलू नये, कोणाच्या कुळाचा उध्दार करू नये. ही सगळी अध्यात्माची प्रशासकिय आचारसंहिता आहे. त्यामुळेच या दौऱ्याला प्रशासकिय दौरा संबोधण्यात आले आहे.
गुरूवर्य मोरे पुढे म्हणाले, अध्यात्म म्हटले की कारभार पारदर्शी असला पाहिजे. श्रध्दा ही अंधळी नसावी तर ती डोळस असली पाहिजे. जर कोणी अध्यात्म, देवाच्या नावावर गैरव्यवहार करीत असेल तर त्या ठिकाणी या प्रशासनाच्या माध्यमातून पारदर्शक काम करावं लागतं. असे गैरप्रकार अध्यात्मात नकोत. भक्तीला विश्वासाचा पाया असतो. एकदा विश्वासाला तडा गेला की तो पुन्हा प्राप्त होत नाही.
धर्मसंस्कृतीमध्ये विविध संस्कार असतात. त्यामागेही शास्त्र असल्याचे सांगताना गुरूवर्य चंद्रकांत मोरे यांनी विविध संस्कारामागे कसे शास्त्र आहे हे उदाहरणासह स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतानाच कफ, वात, पित्त या त्रिदोषावर मात करण्यासाठी आहारशास्त्राचे नियम काटोकोरपणे पाळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आहारशास्त्राचे नियम पाळले तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागणार नाही, औषधे घ्यावी लागणार नाहीत असे ते म्हणाले.
एक हजार खाटांचे सदगुरू मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न गुरूमाऊलींनी बोलून दाखविले आहे. ही काळाची गरज आहे. एखाद्या रूग्णाला रूग्णालयात दाखल केले तर मोठया प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. गरीबातल्या गरीबाला मोफत उपचार मिळाले पाहिजेत हा त्यामागचा हेतू आहे. या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या रूग्णाचे पुण्य कष्टाचा, घामाचा रूपया देणाऱ्या सेवेकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे.
१ नोहेंबर १९९२ रोजी गुरूपीठाचं भुमिपुजन करण्यात आले. १९९५ मध्ये कुमारमंगल बिर्ला यांनी तेथे येऊन बिर्ला उद्योगसमुहाच्या वतीने गुरूपीठाला १५ कोटींची देणगी देऊ केली होती. त्यावेळी टाटा, बिर्ला, अंबानींच्या पैशातून गुरूपीठ बांधायचे नाही तर सेवेकऱ्यांच्या घामाच्या एक एक रूपयांमधून ते उभारायचे असल्याचे त्यावेळी गुरूमाऊलींनी त्यांना सांगितले होते. साडेसतरा वर्षांच्या कालावधीनंतर गुरूपीठ उभे राहिल्याची आठवण गुरूवर्य चंद्रकांत मोरे यांनी यावेळी करून दिली.
प्रास्ताविक भाषणात रामराव गाडेकर यांनी स्वामी समर्थ सेवा मार्ग काय आहे ? हा मार्ग कोणकोणत्या विभागात काम करतो ? सण, वार, व्रत कसे करायचे ? ग्राम अभियान , सेंद्रिय शेती, फॅमिली शेतकरी संकल्पनेविषयी माहिती दिली.