पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
अलिकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूकांनंतर अर्ज दाखल न झाल्याने, अर्ज बाद झाल्याने, सदस्य मयत झाल्याने, राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या १५ गावांमधील १७ जागांसाठी पोटनिवडणूका घेण्यात येणार आहेत.
करोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने आता लांबलेल्या विविध निवडणूका घेण्यात येत आहेत. बाजार समिती, नगरपंचायत तसेच जि. प., पं. स. निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर या पोटनिवडणूकांमध्येही राजकिय चुरस पहावयास मिळणार आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांनी त्यासाठी तयारी सुरू केली असून ऐन थंडीमध्ये गावकीचं राजकिय वातावरण तप्त होणार आहे.
वासुंदे येथील प्रभाग २ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झालेले किशोर विठ्ठल साठे हे मयत झाल्याने या जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. वारणवाडी येथील प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखिव असलेल्या जागेसाठी सार्वत्रीक निवडणूकीत अर्ज बाद झाल्याने ही जागा रिक्त होती. पोटनिवडणूक घेऊन ही जागा भरण्यात येणार आहे. कान्हूरपठार येथील प्रभाग २ मधील सर्वसाधारण स्त्रीसाठी राखिव असलेल्या जागेवर सुरेखा संजय नवले या विजयी झाल्या होत्या. त्यांचे निधन झाल्याने या जागची पोटनिवडणूक होईल. वडूले येथील प्रभाग १ मध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या जागेसाठी सार्वत्रीक निवडणूकीत दाखल करण्यात आलेला अर्ज बाद ठरविण्यात आला होता. त्यामुळे या जागेसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. कासारे येथे प्रभाग १ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या जागेसाठी सार्वत्रीक निवडणूकीत अर्जच दाखल झाला नाही. आता या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेण्यात येणार आहे. जाधववाडी येथील प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी दाखल करण्यात आलेला अर्ज बाद झाल्याने तेथे पोटनिवडणूक होईल. ढवळपूरी येथील प्रभाग ५ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत असलेल्या जागेवर विजयी झालेल्या सताबाई सखाराम बुचूडे यांचे निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
पळशी येथील प्रभाग ३ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून विजयी झालेले शिवाजी राजू गायकवाड यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. माळकूप येथील प्रभाग १ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून विजयी झालेले सुभाष लिंबराज गांगुर्डे यांचे निधन झाल्यामुळे तसेच माळकूप येथील प्रभाग १ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव जागेसाठी अर्ज दाखल न झाल्याने आता या दोन्ही जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. वेसदरे येथील प्रभाग २ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी सार्वत्रीक निवडणूकीत अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे पोटनिवडणूकीद्वारे ही जागा भरण्यात येणार आहे. शहंजापूर येथील प्रभाग १ व ३ या दोन्ही प्रभागांतून प्रमोद किसन गवळी हे विजयी झाले होते. त्यांनी प्रभाग १ च्या सदस्यपदाचा राजिनामा दिल्याने तेथे निवडणूक घेण्यात येणार आहे. शहंजापूर येथीलच प्रभाग ३ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षीत असलेल्या जागेसाठी पोटनिवडणूकीत अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे तेथेही निवडणूक घेण्यात येणार आहे. काळकूप येथील प्रभाग १ मधून सर्वसाधारण जागेवर विजयी झालेले संदीप पोपट कदम यांचे निधन झाल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात येईल. जामगांव येथील प्रभाग १ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून विजयी झालेले नितिन देवराम गांगुर्डे यांनी राजिनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक होणार आहे. शेरीकासारे येथील प्रभाग १ मधून सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत जागेवर दाखल करण्यात आलेला अर्ज मागील निवडणूकीचा खर्च सादर न केल्याने बाद ठरविण्यात आला होता. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. दरोडी येथील प्रभाग २ मध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखिव असलेल्या जागेसाठी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्त आहे. पोटनिवडणूकीद्वारे ही जागा आता भरण्यात येणार आहे.