पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
तालुक्यात सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोब्याने संतप्त झालेल्या आमदार नीलेश लंके यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.येत्या चार दिवसांत पारनेर तालुक्यात पूर्ण दाबाने, सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आदेश आमदार लंके यांनी संबंधितांना दिले आहेत.
तालुक्यात परतीचा मोसमी पाऊस समाधानकारक झाल्याने कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.त्याचबरोबर रब्बी हंगामातील गहू,हरबरा या पिकांच्या पेरणीने वेग घेतला आहे.इतर पिकांना,फळबागांना पाणी देण्याची वेळ आली आहे.मात्र अपुऱ्या दाबाने तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याने शेतकरी हैराण झाले आहेत.विंधन विहिरी,विहिरींना सध्या मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी कांदा पिकासह इतर पिके जाळण्याच्या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील किन्ही,बहिरोबावाडी,तिखोल या गावांसह कान्हूर पठार वीज उपकेंद्रांतर्ग येणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांनी आमदार लंके यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी साकडे घातले.आमदार लंके यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क कार्यालयात बोलावून घेतले.तेथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील वीजपुरवठ्याबाबत, उपलब्ध वीज, वीजपुरवठ्यात येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली.चर्चेदरम्यान आमदार लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना कमी दाबाने व वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे तालुक्यात उदभवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील विजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
शेतकरी नेते अनिल देठे, उद्योजक सुरेश धुरपते,विद्युत सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे,बाळासाहेब खिलारी,प्रकाश गाजरे,संदीप ठाणगे,अनिल तांबडे,संदीप चौधरी,हरेराम खोडदे,राजाराम देठे,वैभव देठे बैठकीस उपस्थित होते.
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकांमुळे पल्लवीत झाल्या आहेत.
निसर्गानेही साथ दिली आहे.आता सुरूळीत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ‘महावितरण’ ची आहे.ही जबाबदारी अधिकाऱ्यांनी योग्य रितीने पार पाडावी.अपुऱ्या व वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे पिके जळाली तर संबंधितांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार लंके यांनी यावेळी दिला.
चार दिवसात होणार वीजपुरवठा सुरळीत
नगर येथून पारनेरला वीज पुरवठा होत असलेल्या १३२ केव्हीए क्षमतेच्या, उच्चदाब विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीचे चास (नगर) येथे सुरू असलेलेले काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहे.त्यामुळे तालुक्याला सध्या पुणे जिल्ह्यातून वीजपुरवठा होत आहे.मात्र मागणीच्या प्रमाणात वीजपुरवठा होत नसल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे.उच्चदाब वाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर,येत्या चार दिवसांत तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत होईल.
प्रशांत आडभाई, उपकार्यकारी अभियंता,महावितरण पारनेर उपविभाग.