नाशिक : पारनेर अपडेट मिडिया
पाकिस्तान सरकार (pakistan) कांद्याच्या निर्यातबंदीचा (Onion export) विचार करत असल्याने तेथील फळ व भाजीपाला निर्यातदार-आयातदार आणि व्यापाऱ्यांच्या संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यातच, भारतातर्फे निर्यातबंदीचा विचार होऊ शकतो, अशी अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल झाली.
पाकिस्तानमध्ये १५ दिवसांचा कालावधीपाकिस्तानमधील जुना कांदा आणि नवीन कांद्याची आवक सुरू होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. सिंध प्रांतात कांद्याची काढणी सुरू झाली असून, ही आवक वाढण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचे पाकिस्तानमधील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत पाकिस्तानमध्ये स्थानिक कांद्याचा भाव १२ रुपयांवरून १९ रुपयांपर्यंत पोचला आहे. ही भाववाढ लक्षात घेऊन पाकिस्तान सरकार कांदा निर्यातबंदीचा विचार करत असल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली होती. सध्या व्यापाऱ्यांकडून पाकिस्तानचा कांदा मलेशियामध्ये ३७० डॉलर टन या भावाने पोच दिला जातोय. दुबईसाठी हाच भाव ३९० डॉलर आहे. दुसरीकडे मात्र मलेशियामध्ये भारतीय कांदा पाठविण्यासाठी आताच्या भावाने ६१० डॉलर, तर दुबईसाठी ५८० डॉलरपर्यंत भाव पोचणार आहे. म्हणजेच, भारतीय कांद्याला पाकिस्तानच्या तुलनेत किलोला १५ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढल्याने भारतीय निर्यातदारांनी निर्यातीऐवजी देशांतर्गत कांदा पाठविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
उन्हाळ कांद्याचा किलोचा भाव वाढलादक्षिणसोबत राजस्थानमधील (onion news) कांद्याचे पावसाने नुकसान झाल्याने देशांतर्गत नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा भाव किलोला ४० ते ४२ रुपयांपर्यंत भिडला. सोमवारी (ता. ४) भारतातर्फे निर्यातबंदीचा विचार होऊ शकतो, अशी अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल झाली. राजकोट (गुजरात) येथे सोमवारी क्विंटलभर कांद्याचा सरासरी भाव दोन हजार ६५० रुपये राहिला. बेंगळुरूमध्ये स्थानिकचा एक हजार ७५०, तर पुण्याच्या कांद्याला तीन हजार, अंचल (केरळ) येथे पाच हजार ४००, विजयनगर (राजस्थान) येथे दोन हजार ८५, तेलंगणामधील रायतू बाजारमध्ये तीन हजार ५००, बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) दोन हजार ६००, असनसोलमध्ये (पश्चिम बंगाल) दोन हजार १०० रुपये असा भाव निघाला.
कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत सोमवारी विकलेल्या कांद्याला क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा :
येवला- ३ हजार ३५०, नाशिक- ३ हजार ८००, लासलगाव- ३ हजार १५०, मुंगसे- ३ हजार १५०, कळवण- ३ हजार ६५०, चांदवड- ३ हजार २००, मनमाड- ३ हजार ४००, सटाणा- ३ हजार ३७५, पिंपळगाव- ३ हजार ४५१, देवळा- ३ हजार ३५०, नामपूर- ३ हजार ५००
उन्हाळ कांद्याचा २५ ते ३० टक्के साठा आहे. अशातच, येत्या काही दिवसांमध्ये नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरवात होईल. पण शेतकऱ्यांनी साठविलेल्या कांद्याचा भाव अधिकचा झाला असल्याने शेतकऱ्यांना अधिकच्या भावाची अपेक्षा आहे. ही स्थिती एकीकडे असताना कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून, चेन्नईमधून जाणाऱ्या कांद्याचे ‘बिलिंग’ बंद झाल्याच्या अफवा पसरल्याने निर्यातदारांना त्याबद्दलची खात्री करून घेण्यासाठी सायंकाळ झाली. ‘बिलिंग’ बंद झाले नसल्याची माहिती मिळाल्याने निर्यातदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला. २०१९ आणि २०२० मध्ये सप्टेंबरमध्ये कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने केली होती. २०१९ ची निर्यातबंदी मार्च २०२० मध्ये, तर गेल्या वर्षीची निर्यातबंदी जानेवारी २०२१ मध्ये उठविण्यात आली होती. नेमका हा अनुभव जमेस असल्याने निर्यातदारांच्या नजरा केंद्र सरकारच्या या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे खिळल्या आहेत.
देशांतर्गत कांद्याची स्थिती राजस्थान – पावसाने कांद्याचे ३० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. मात्र राजस्थानमधील शेतकऱ्यांनी २५ टक्के अधिकचे उत्पादन घेतले असून, या महिन्याच्या मध्याला नवीन कांद्याची आवक अपेक्षित आहे. त्यावरून राजस्थानच्या कांद्याच्या आवकेमध्ये फारसा फरक पडणार नाही, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. दक्षिण भारत – कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे. पण हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आहे. शिवाय मागील दोन वर्षांतील नुकसानीच्या अनुभवामुळे दक्षिणेतील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड अधिक केली आहे. राजस्थान आणि दक्षिणेतील सोबत मध्य प्रदेशातील कांद्याची आवक सुरू होणार आहे.