मुंबई : पारनेर अपडेट मिडिया
राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळालेला असताना त्यापाठोपाठ शुक्रवारी संध्याकाळी उशीरा राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळेही खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली होणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर विरोधकांकडून आणि काही स्थानिक संस्थांकडून होणारी मागणी मान्य झाली आहे. तसेच, शाळांपाठोपाठ सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिल्याने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे वगळता राज्यात फारसे निर्बंध लागू नसतील. नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांनाही लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
करोनाची दुसरी लाट आल्यावर गेल्या एप्रिलमध्ये सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. रुग्ण कमी झाल्याने प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरला राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.