मुंबई : पारनेर अपडेट मिडिया
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उघडकीस आलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारांस कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. मात्र, या मुद्द्यावरून आरोप करत विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. “बलात्काराची अशी प्रकरणं समोर येतात आणि राजकीय पक्ष बेबंदपणे अशा प्रकरणांचा गाजावाजा करून आपापल्या राजकीय मतलबाच्या पोळ्या भाजतात, तेव्हा त्या राजकारणाचीही किळस वाटते”, अशा शब्दांत शिवसेनेकडून सामनाच्या अग्रलेखात टीका करण्यात आली आहे.
साकिनाका, डोंबिवली येथील बलात्काराच्या घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र, तरीदेखील याकडे डोळेझाक करून विरोधक सरकार, पोलिसांवर चिखलफेक का करत आहेत? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. “डोंबिवली प्रकरणाचा गवगवा सुरू असताना बोरिवलीतील भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजपा पदाधिकाऱ्याने केला. या प्रकरणात भाजपाच्या सर्व ताई, माई, आक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून बसले आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेने सामनातून भाजपावर निशाणा साधला आहे.
..हे धोरण दुटप्पी
“भाजपा कार्यालयात ज्या महिलेचा विनयभंग झाला, ती त्यांचीच कार्यकर्ती आहे. या पीडित महिलेनेही पोलिसांत गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. बोरिवली प्रकरणातही भाजपाच्या ताई-माई-आक्कांनी डोळे ओले करायला हरकत नव्हती, पण त्यांनी अश्रूंना बांध मोकळा करून दिला तो साकिनाका, डोंबिवली प्रकरणी. हे धोरण दुटप्पी आहे” ,असं देखील यात नमूद केलं आहे.
“फक्त कायद्याने हे अत्याचार थांबणार नाहीत”
दरम्यान, फक्त कायद्याने हे अत्याचार थांबतील, अशी अपेक्षा करता येणार नाही असं यात म्हटलं आहे. “समाजातील वाढत्या विकृतीचा प्रश्न आहेच. कायद्याची भिती नाही, यापेक्षाही समाजा उफाळलेल्या विकृतीवर कायदा हतबल ठरतो. हे असले प्रकार घरात, शाळेत, पवित्र नात्यांत, जवळच्या मित्र-मैत्रिणींत, ओळखीत होत आहेत आणि तिथे कायदा प्रभावी कसा ठरणार?” असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
“तरुण मुलांत व्यसनाधिनता वाढत आहे. निराशा, वैफल्याने त्यांना ग्रासलं आहे शिक्षण थांबलं आहे आणि डोकी रिकामी आङेत. त्या रिकाम्या डोक्यांत सैतान घर करीत आहे. ही सैतानी डोकी विकृतीचा नंगानाच करत आहेत. महाराष्ट्र महिलांसाठी नक्कीच सुरक्षित आहे. मुंबई तर जगातील सगळ्यात सुरक्षित शहर आहे. तरीही साकिनाका ते डोंबिवलीपर्यंत अबलांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. ही विकृती मोडून काढावीच लागेल”, अशा शब्दांत या घटनांविषयी शिवसेनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.