मुंबई : पारनेर अपडेट मिडिया
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गणेश वंदना’ या टायटलने हे साँग रिलीज करण्यात आलंय. त्याच अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी, विविध विषयांवर त्यांना बोलतं केलं. त्यात, तुमचा आवडता बंगला किंवा घर कोणतं?, असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी सविस्तरपणे उत्तर दिलंय. नागपूरच्या घरी आपण एन्जॉय करायचे, असेही त्यांनी म्हटलंय.
अमृता फडणवीस यांनी विविध विषयावर परखडपणे मत मांडलं. त्यांचं गणेश वंदना हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यासंदर्भात त्यांनी लोकमत सखी मंचावर गप्पा मारल्या. त्यावेळी, सध्या राहत असलेल्या सागर बंगल्यावर तणावमुक्त असल्याने मी अधिक खूश असल्याचं अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलं. नागपूरचं घर, वर्षा बंगला आणि आत्ताचा सागर बंगला, ह्या तिन्ही जागा माझ्या मनाच्या जवळ आहेत. त्याची कारण वेगवेगळी होती. नागपूरचं घर म्हणजे माझ्या आईचं घर आहे, ते घर माझं जान आहे. वर्षा बंगला ही एका जबाबदारीची जागा होती, त्यामुळे वर्षा बंगल्यावर मी एन्जॉय केलं, असे तुम्ही नाही म्हणू शकत. मी वर्षा बंगल्यात एन्जॉय नाही केलं. पण, मी सातत्याने याच विचारात असायचे की, या पोझिशनला मी अल्टीमेट कसं करू, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
सागर बंगल्यातच खूप खूश
मी नागपूरच्या घरी एन्जॉय केलं, आज इथं सागर बंगल्यातही एक मेंटल रिलीफ आहे. जे करायचंय ते मी करतेसुद्धा, कारण इथे पोझिशनचा प्रेशर नाही. त्यामुळेच, फ्रीडम ऑफ माईंडचा विचार केल्यास मी सागर बंगल्यात खूप खुश आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं. नागपूरच्या घरीही खूश होती, पण वर्षा बंगल्यात राहत असताना, या जागेचा फायदा लोकांसाठी कसा करता येईल, हाच विचार मी करायचे, असे अमृता यांनी म्हटले.
लोकं एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात
आपल्या गाण्यासंदर्भात लोकाचं मत कसं आहे, हे विचारल्यावर त्यांनी परखडपणे आपलं मत व्यक्त केलं. जेव्हा माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात. मी एका भाजपा नेत्याची पत्नी आहे, म्हणून मी काहीही केलं किंवा म्हटलं. तर, या लोकांना वाटतं की, मी तेथून प्रेरणा घेऊनच हे करत आहे. पण, माझ्या ट्विटरवरील ज्या कमेंट असतात, त्या माझ्या विचारानुसार, मला वाटलं की असं लोकांपुढे म्हणायचं आहे, तर ते ट्विट केललं असतं. माझा भाजपाकडे कल आहे, किंवा मी देवेंद्र फडणवीसांची पत्नी आहे, म्हणून ते लिहित नाही, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, गाणं ही माझी फॅशन आहे, त्यामुळे मी गाणं करत असते, असेही त्यांनी म्हटलं.