पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
भाजपाचे अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून ओळख असलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारनेरकर तसेच पत्रकारांची गुरुवारी घोर निराशा केली ! “पारनेर काखान्याच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, कोणी लबाडी केली असेल तर त्याला सोडणार नाही, किरीट सोमय्या कोणाला घाबरत नाही !” ऐवढेच काय ते सांगून गेले. एकंदरीत त्यांची भुमिका सावध असल्याचे तसेच महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करून भाजपाचे मार्केटींग करण्याचीच असल्याचे संपूर्ण दौऱ्यादरम्यान दिसून आले ! बिग ब्रेकिंग होईल अशी अपेक्षा असलेला आक्रमक सोमय्या यांचा पहिलाच पारनेर दौरा वांझोटाच ठरला !
पारनेर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करून कारखाना बचाव समितीचे बबनराव कवाद, रामदास घावटे, साहेबराव मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात संघर्ष करीत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही न्यायालयाचा दरवाजा ठोेठावलेला आहे. हजारे राज्यातील अशा प्रकारे विक्री झालेल्या कारखान्यांमधील भ्रष्टाचाराविरोधातही ज्येष्ठ विधिज्ञांच्या मदतीने लढा देत आहेत. या पार्श्वभुमिवर किरीट सोमय्या यांनी पारनेर कारखान्याच्या विक्रीचा प्रश्न हाती घेऊन पारनेर दौऱ्याची घोषणा केली. सोमय्या यांनी हा प्रश्न हाती घेतल्यानंतर ते काहीतरी ठोस भुमिका मांडतील, साखर कारखाने विक्रीबाबत ज्या अजित पवार यांच्यावर संशय घेतला जातोय त्यांच्यावर घणाघात करतील अशी अपेक्षा होती. पंरतू ती फोल ठरली !
कारखाना बचाव समितीने दिलेल्या कागदपत्रांच्या अधारेच त्यांनी पारनेरात येऊन आरोपांच्या फैरी झाडल्या. आरोप करताना आरोप नव्हे तर मी पुराव्यासह बोलतोय. आरोप म्हणाल तर तो शेतकरी व कामगारांचा अपमान ठरेल असेही ते म्हणाले. मात्र एकीकडे पुरावे घेऊन बोलतोय असे सांगणारे सोमय्या चौकशीत सत्य बाहेर येईल त्यानंतर ती त्यांना सोडणार नाही अशीही सावध भुमिका घेत होते.
पारनेर कारखान्याची विक्री झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्याच वेळी ही विक्री थांबविता आली असती याची आठवण करून दिली असता सोमय्या यांनी बचावात्मक पवित्रा घेत एखादयाने केलेली चोरी लगेच उघड होत नाही. बचाव समितीने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण माझ्यासमोर आले आहे. आता याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी सांगितले. पारनेर कारखाना विक्री प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक शेतकयांनी, कामगार संघटनांनी फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, त्याकडेही सोमय्या यांनी दुर्लक्ष केले ! दुसरीकडे राज्य सहकारी बँकेतील घोटाळे उघड झाल्यामुळे कारखाने विक्रीचे घोटाळे बाहेर आल्याचेही ते सांगत होते.
पारनेर कारखान्यावर येउन मी सभासदांशी, कामगारांशी बोलून अधिकची माहीती घेणार असल्याचे सोमय्या यांनी जाहिर केले होते. कारखान्याची पाहणी केल्यानंतर ते कामगारांना भेटण्यासाठी गेले असता ‘क्रांती शुगर हटाव, पारनेर बचाव’ ही घोषणा आम्हाला देशोधडीला लावणारी असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या. कारखाना बंद पडला तर आमच्या रोजीरोटीचे काय असा थेट सवाल त्यांनी केला. त्यावेळी सावध होत कारखाना बंद होऊ दिला जाणार नाही. लबाडी झाली असेल तर त्यांना सरळ करायला नको का ? असा प्रश्न करतानाच लबाडी झाली असे मी म्हणणार नाही. चौकशी सुरू आहे. त्यानंतर खरी माहीती पुढे येईल अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कामगार आपल्या व्यथा मांडताना ‘तुला कोणी शिकवून पाठविलंय का ?’ अशा शंकाही त्यांनी उपस्थित केल्या. कामगार नेत्यालाही त्यांनी सविस्तर बोलू दिले नाही.
कामगारांच्या भेटीनंतर सोमय्या सभासदांना सामोरे गेले. बचाव समितीचे रामदास घावटे भुमिका मांडत असताना त्यांनी त्यांना भाषण आटोपते घेण्यास भाग पाडले. एकाही शेतकऱ्याची भुमिका समजाऊन न घेता त्यांनी त्यांचे भाषण सुरू केले. कारखान्यापेक्षा आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही.
पारनेर येथे पार पडलेल्या पत्रकार परीषदेत सोमय्या यांनी आघाडी सरकारलाच लक्ष्य केले. श्रीगोंदे येथील साईकृपा कारखान्याच्या सभासदांचे कोटयावधी रूपये थकले आहेत. बबनराव पाचपुते भाजपामध्ये आहेत त्यामुळे त्याविरोधात तुम्ही आवाज उठवित नाही का ? या पत्रकाराच्या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली. माझ्याकडे तक्रारच आली नाही ! असे हस्यास्पद उत्तर त्यांनी दिले. राज्यातील भाजपाच्या नेत्यांच्या कारखान्यांविषयी तुम्ही बोलत नाहीत या प्रश्नावरही कोणी माझ्याकडे तक्रारच करत नाही हे साचेबध्द उत्तर त्यांनी दिले. तुम्हाला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करायची होती तर ती कोणत्याही पोलिस ठाण्यात दाखल करता येऊ शकत होती, तरीही तुमचा कोल्हापूरला जाण्याचाच अट्टहास का ? या प्रश्नावर मला अंबाबाईच्या दर्शनाला जायचे होते. पुन्हा मी कोल्हापूरला जाईलच असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
स्वतःवरील ‘फोकस’ ढळू दिला नाही !
संपूर्ण दौऱ्यात सोमय्या यांनी स्वतःवरील कॅमेऱ्याचा फोकस तसूभरही ढळू दिला नाही. शेतकरी, कामगारांना बोलू दिले नाहीच परंतू राज्यपातळीवरील नेते आले म्हणून कारखाना स्थळी असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे, कारखाना बचाव समितीच्या सदस्यांचे त्यांनी नावही घेतले नाही.
हजारे यांची भेटही टाळली !
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राज्य सहकारी बॅकेने कवडीमोल भावात विकलेल्या कारखान्यासंदर्भात न्यायालयात गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहेत. पारनेर कारखान्याचाही त्यात समावेश आहे. हजार हे कारखान्यांसदर्भात ठोस भुमिका घेत असताना सोमय्या हे हजारे यांची भेट घेऊन त्यांचा कानमंत्र घेतील अशी अपेक्षा होती. परंतू त्यांनी हजारे यांची भेट टाळल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पारनेर येथून शिरूरकडे जाताना ते सुपे मार्गे गेले, राळेगणसिध्दीचा जवळचा मार्ग त्यांनी पसंत केला नाही हे विशेष ।