पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पवार आणि ठाकरे या डाकू प्रवृत्तींनी सरकार स्थापन केल्यापासून,गेल्या १९ महिन्यात राज्यात हाहाकार उडाला असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेची सक्त वसूली संचालनालया (ईडी) मार्फत चौकशी करावी या मागणीच्या अनुषंगाने सोमय्या यांनी पारनेर कारखाना कार्यस्थळावर उस उत्पादक शेतकरी आणि कामगारांशी चर्चा केली.त्यानंतर त्यांनी पारनेर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबाग समुद्र किनाऱ्यावर १९ बंगले खरेदी केले आहेत हा व्यवहार संशयास्पद आहे.तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात कोट्यावधी रुपये खर्च करून रिसॉर्ट उभारण्याचा प्रकारही संशयास्पद असल्याचे विविध आरोप सोमय्या यांनी केले.
साखर उद्योग आणि पवार कुटुंब हे समानार्थी शब्द आहेत.जरंडेश्वर साखर कारखाना ओंकार बिल्डरने राज्य सहकारी बॅंकेकडून लिलावात विकत घेतला आणि लगेचच पवार कुटुंबियांना भाडेपट्ट्यावर चालवण्यास दिला.ओंकार बिल्डरने ‘जरंडेश्वर’ विकत घेण्यासाठी पैसे कसे उभे केले याची चौकशी झाली पाहिजे.तसेच पारनेर साखर कारखाना विकत घेण्यासाठी क्रांती शुगर विकत घेण्यासाठी भांडवल कसे उभे केले याची चौकशी झाली की सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.या उद्योगांमागे कोण आहे हे जनतेच्या लक्षात येईल असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान कारखाना कार्यस्थळावर बोलताना सोमय्या म्हणाले की,राज्य सहकारी बँकेने संशयास्पदरीत्या विक्री केलेल्या साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारांची चौकशी व्हावी यासाठी संपूर्ण राज्यात जागृती झाली आहे.उस उत्पादक शेतकरी, कामगार, राज्य सहकारी बँकेने केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करीत आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या संशयास्पद विक्री व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे.’पारनेर’च्या सभासदांना निश्चित न्याय मिळेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘पारनेर’च्या विक्री व्यवहाराची सक्त वसूली संचालनालया (ईडी) मार्फत चौकशी करण्याचे आदेश देऊनही सक्तवसुली संचलनालयाच्या मुंबई विभागाने कारवाई केली नाही.त्यामुळे पारनेर कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव कवाद यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,’ईडी’ चे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ‘पारनेर’ च्या संशयास्पद विक्री व्यवहाराची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती.त्याचवेळी घावटे व कवाद यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट ‘पारनेर’प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती केली होती.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष दक्षिण अरुण मुंडे, रामदास घावटे, बबन कवाद, साहेबराव मोरे, विश्वनाथ कोरडे, अश्विनी थोरात, सुनिल थोरात, कामगार नेते शिवाजी औटी, सुभाष बेलोटे, बाबुराव मुळे आदी उपस्थित होते.
माजी खासदार सोमय्या म्हणाले की, सभासदांच्या कष्टाच्या पैश्यातून उभारलेल्या साखर कारखान्यांची विक्री धनदांडग्या राजकारण्यांच्या आर्थिक फायद्यासाठी केली जाते ही संतापजनक बाब आहे.चालू अवस्थेतील पारनेर कारखाना कोणी बंद पाडला.कोणाच्या सांगण्यावरून कोट्यावधी रुपयांच्या कारखान्याच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री झाली याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे सोमय्या म्हणाले.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या हिताच्या आड कोणी येणार असेल, किरीट सोमय्या पारनेरला अल्यामुळे कारखाना बंद पडेल असा कोणी शेतकरी व कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भ्रम निर्माण करीत असतील तर त्यांच्या बंदुकितील गोळया आपल्याकडे असल्याचे सोमय्या म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद होणार नाही, शेतकरी व कामगारांच्या हिताची जपवणूक करण्यासाठीच मी इथे आल्याचे ते म्हणाले.
न्याय मिळवून देणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पारनेर साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्याकडे केली.त्यांनी चौकशी करण्याचे मान्य केले.कारखाना बचाव समितीने आणि कामगारांनी गैरव्यवहाराची कागदपत्रे आपणाकडे दिली.’पारनेर’ च्या सभासदांना,उस उत्पादकांना, कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.
किरीट सोमय्या,माजी खासदार.
राष्ट्रवादीचे दुर्लक्षच
माजी खासदार सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता.या पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ‘राष्ट्रवादी’ काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता होती.मात्र पारनेर कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्फत प्रयत्न करीत आहेत.पारनेर कारखाना हा तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमय्या यांच्या दौऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.पोलिसांनाही या गोष्टीची कल्पना होतीच तरही खबरदारीचा उपाय म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.