नक्षल्यांच्या घातक हल्ल्यात २२ जवान शहीद
विजापूरच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर १४ जवान होते बेपत्ता
बेपत्ता जवानांचे मृतदेह जंगलात सापडले.
विजापूर (छत्तीसगढ) : पारनेर अपडेट मिडिया
छत्तीसगढमधील विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर१४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, २२ जवान शहीद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चकमकीत जवानांनी १५ नक्षल्यांना कंठस्नान घातलं आहे.
सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी नक्षलविरोधी कारवाई करीत असताना ही अचानक चकमक उडाली. या संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकातील जवान, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे दोन हजारांहून अधिक कर्मचारी होते. यावेळी नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांकडून गोळीबार करण्यात आला. ही धुमश्चक्रीत सुरक्षा दलातील पाच जवान शहीद झाले, तर अन्य १२ जण जखमी झाले होते. तर ४ जवान बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सुरक्षा दलाने सुकमा आणि विजापूर सीमा परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती.
या शोधमोहिमेदरम्यान बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात आढळून आले. त्यामुळे नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत एकूण २२ जवान शहीद झाले आहेत. तर १ जवान अजून बेपत्ता असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. या धुमश्चक्रीत तब्बल ३१ जवान जखमी झाले आहेत. जवानांना तातडीने विजापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून, सात जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली. कुलदीप सिंह यांनी छत्तीसढमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या चकमकीत १५ नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त असून, यात एका महिलेचाही समावेश आहे.
विजापूरच्या जंगलात काय घडलं?
सुकमा-विजापूर सीमाभागात बस्तरच्या दक्षिणेकडे जंगलात नक्षलवाद्यांचा मोठा अड्डा आहे. विजापूरपासून ते सुकमा जिल्ह्यापर्यंत शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाई करण्यात हाती घेण्यात आली होती. शनिवारी (३ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गस्ती पथक आणि पीएलजीएच्या नक्षलवाद्यांमध्ये जोनागुडा गावात चकमक सुरू झाली. ती जवळपास तीन तास सुरू होती. सुरूवातीला यात पाच जवान शहीद झाले होते, तर १२ जण जखमी झाले होते. मात्र, त्यानंतर सुरक्षा दलाचे तब्बल १४ जवान बेपत्ता असल्याच समोर आलं. या बेपत्ता जवानांचे मृतदेह जगलात सापडले आहेत.