संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचे आ. लंके यांना निवेदन
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ अशी दुरूस्ती करण्याची शिफारस करावी यासाठी विधीमंडळात आवाज उठविण्याची ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष डी. आर. शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास शुक्रवारी दिले.
इंजि. डी. आर. शेंडगे यांच्यासह अमित गावडे, संभाजी रूपनर, नवनाथ गावडे, नानासाहेब रूपनर यांच्यासह इतर धनगर बांधवांनी आ. लंके यांची भेट घेउन निवेदन सादर केले. आपला मतदारसंघ हा धनगर व मेंढपाठ बहुल मतदारसंघ असून ही जमात ७० वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. समाजाचा शैक्षणिक, अर्थिक, सामाजिक व राजकिय विकास खुंटलेला आहे.
मेंढपाळांवर बिबटयाचे हल्ल्ले होत असून त्यात मेंढपाळ जखमी होणे, मृत्यू पावणे अशा घटनाही घडू लागल्या आहेत. मेंढपाळांना शासनाने मोफत पिस्तुल तसेच त्याचा परवाना द्यावा, मेंढया व मेंढपाळांचा विमा शासनाने स्वखर्चाने काढावा अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मेंढपाळ बांधवांच्या समस्या आपण जाणून आहोत. ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ या दुरूस्तीची शिफारस करण्यासंदर्भात आपण विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून वर्षानुवर्षांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही भुमिका घेऊ अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली. धनगर समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भातही सकारात्मक भुमिका घेण्याची ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.