पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर प्रभाग क्र. ११ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुहास लहूराव रेपाळे यांनी आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे ! रेपाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादीचे उमेदवार विजय डोळ यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक नंदकुमार देशमुख, डॉ. बाळासाहेब कावरे, वैभव उर्फ बंडू गायकवाड यांनी पुढाकार घेत रेपाळे यांची आ. नीलेश लंके यांच्याशी भेट घडवून आणली. या भेटीत आ. लंके व रेपाळे यांच्यात झालेल्या चर्चेत आ. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या माध्यमातून काम करण्याची संधी रेपाळे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज बिनशर्त मागे घेत डोळ यांच्याबरोबरीने प्रचारात सहभागी होण्याची घोषणा केली. तसेच यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचेही जाहिर केले.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सर्वच प्रभागात समर्थन मिळत आहे. पारनेर शहरास भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आहे. या योजनेसाठी निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात शहराचा साधा विकास आराखडाही तयार होऊ शकला नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे. विकास आराखडाच नसेल तर विकास कसा होणार ? असा सवाल करून आमच्या हाती सत्ता आल्यानंतर शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येऊन सर्वागिण विकास करण्याचे आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. विजय डोळ हे आमचे जुणे सहकारी सोबत आले आहेत. त्यांच्याबरोबरीने अनेक शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.