आ. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील कान्हूर पठार येथील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार निलेश लंके दिली.
कान्हूर पठार हा पठारी भाग आहे. या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे व इतर मोठ्या शहरात जावे लागत होते. येथील खर्च विद्यार्थ्यांना पेलवत नव्हता.त्यामुळे कान्हूर पठार येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व्हावी अशी परिसरातून मागणी होत होती याबाबत आमदार निलेश लंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत या अभ्यासिकेला मान्यता मिळाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ९८ लाख ३० हजार ३०७ रुपयांच्या अभ्यासिकेच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यताही दिल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.
यापूर्वीही तालुक्यातील निघोज येथील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी आमदार लंके यांच्या प्रयत्नाने एक कोटी रुपयांच्या अभ्यासिकेचे काम प्रगतिपथावर आहे.तालुक्यातील निघोज पाठोपाठच कान्हूर पठार येथेही अभ्यासिकेस मान्यता मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच पारनेर शहरातील विद्यार्थ्यांसाठीही सुसज्ज अभ्यासिका तयार करण्याचा मनोदयही आमदार लंके यांनी यावेळी व्यक्त केला.
तालुक्यातील दोन प्रमुख गावात अभ्यासिकेला मंजुरी मिळाली असल्याने दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षाच्या शिक्षणाची परवड आता थांबणार आहे.पालकांचाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा मोठा खर्च वाचणार असल्याने तालुक्यातील पालकांनीदेखील आमदार लंके यांना धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.