पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
एखदा लोकप्रतिनिधी निवडूण आल्यानंतर जनतेने त्याला दिलेल्या संधीचं तो सोनं करायला निघालाय की लोखंड करायला निघालाय हे तपासावं लागतं. गेल्या दोन वर्षात ते तपासलं असता हा संधीचंं लोखंड करायला निघाला असल्याचे जाणवल्याचे सांगत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर जोरदार टिकाश्र सोडले. आगामी निवडणूकांसदर्भात राज्य पातळीवर काय निर्णय होईल याची कल्पना नाही मात्र पारनेर तालुक्यात घडयाळाला मत द्यायला सांगायला आम्हाला जमणार नाही ! असेही औटी म्हणाले. सामान्य माणूस भरडला जात असेल, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर या वयात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. मी आजूनही हिंम्मत हारलेलो नाही. तालुका हादरवून टाकेल, हिंम्मत असेल तर समोरासमोर युक्तीवाद करायला या असे आव्हानही औटी यांनी दिले.
पारनेर शहरातील मनकर्णीका लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात औटी बोलत होते. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जि. प.च्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते (सर), संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रुमख शशीकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, ताराबाई चौधरी, पोपट चौधरी, युवा सेना प्रमुख नीतीन शेळके, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, नगराध्यक्षा वर्षा नगरे, शंकर नगरे, अनिकेत औटी, नीलेश खोडदे, युवराज पठारे, सुरेश बोहृडे, बाळाासाहेब पठारे, दिलीप दाते, दत्ताशेठ कुलट, राजू शेख, बबन शेख, दत्ता औटी यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. विजय डोळ व कैलास श्रीमंदीलकर यांनी प्रास्ताविक केले. शंकर नगरेे यांनी आभार माणले.
यावेळी पुढे बोलताना औटी म्हणाले, राज्याच्या विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्याचा निर्णय उध्दव ठाकरे यांना घ्यावा लागला. अशी भुमिक का घ्यावी लागली त्या गोष्टींचे काही ठराविक साक्षिदार आहेत. त्यापैकी मी एक आहे. मागील सरकारमध्ये पहिला अन्याय माझ्यावरच झाला. नैसर्गिक निर्णय प्रक्रियेप्रमाणे तिन महिन्यात माझ्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद येणे अपेक्षित होते. मात्र तसेच झाले नाही. प्रादेशिक पक्ष संपविण्याचे धोरण भाजपाने अवलंबिण्यास सुरूवात केली. त्यामुळेच भाजपा सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले.
दिल्लीला हळदी कुंकू घेऊन गेले !
गेल्या वर्षी तालुक्याचे लोकप्रतिनिधी के के रेेजचा प्रश्न घेऊन शरद पवार यांच्यासोबत दिल्लीला गेले. राजनाथसिंह यांची भेट झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याची त्यांनी घोषणा केेली. जणू काही दिल्लीला जातानाच ते हळदी कुंकू घेऊन गेले होते! या प्रश्नाचे नेमकी काय स्थिती आहे याचा उलगडा खासदार डॉ.सुजय विखे यांनी त्यानंतर केला. के. के. रेंजची जागा ताब्यात घेऊन तेथे औद्योगिक वसाहत उभे करण्याचे स्वप्न दाखविले गेले होते !महामंडळाचे अधिकारीही तेथे बोलविण्यात आले. यासंदर्भात बाबासाहेब तांबे यांच्या मार्फत महामंडळाचे पी. अन्बलगन यांच्याशी संपर्क केला असता या प्रस्तावाची फाईल कार्यालयाच्या पहिल्या पायरीवरही येऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगत या वसाहतीचा फोलपणा उघड केला.
लोकप्रतिनिधी जनतेला वेड्यात काढीत आहेत !
लोकप्रतिनिधींकडून समाजाला वेडयात काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगत औटी म्हणाले, के के रेंजसंदर्भात शरद पवार हे संरक्षण मंत्री असताना खा. शंकरराव काळे यांच्यासमवेत आपण त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी संरक्षण खात्याच्या अधिकायांनी १९५४ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरूस्तीमध्ये हा भाग कोणत्याही परीस्थितीत खाली करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मग या भागात औद्योगिक वसाहत कशी उभी राहणार ? असा प्रश्न त्यांनी केला. पारनेरचा कारखानाही सभासदांच्या स्वमालकीचा होणार होता. जो कारखाना राज्य सहकारी बँक, राज्य सरकारने विक्री केला आहे तो सभासदांच्या मालकीचा कसा होउ शकतो ?असा सवाल त्यांनी केला. मध्यंतरी कान्हूरपठारच्या चौकात टोल नाक्यावर त्रास होतो अशी तक्रार करण्यात आल्यानंतर तो टोलनाका पाडून टाकतो अशा वल्गना करण्यात आल्या. आजही तो टोलनाका तसाच उभा आहे. तेथे टोलवसुली सुरू आहे. या सगळया गोष्टी गेल्या दोन वर्षात मी पाहत होतो असे औटी म्हणाले.
जनतेला वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न
जनतेला वेगळया पध्दतीने नेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. जिल्हा दुध संघावर प्रतिनिधी नेमण्यात आले, त्यावेळी शिवसेनेचा प्रतिनिधी घेतला नाही. जिल्हा बँकेत तालुक्याचे दोन संचालक आहेत. तेथेही शिवसेनेला संधी दिली गेली नाही. आमचे असे होणार असेल तर आम्हालाही शंकरराव गडाख यांनी बॅट घेतली त्याप्रमाणे हाती तलवार घ्यावी लागेल. कारण आजवर कार्यकर्त्यांनी भयानक संघर्ष केला आहे असे ते म्हणाले.
मतदार संघ वाचविण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं !
सन २००७ मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत पारनेरचा बळी गेला होता. तालुक्यातील जनतेला तिन ठिकाणी फेकले गेले होते. मतदारसंघ वाचविण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं. डीलीमीटेशन कमीशनचा अभ्यास केला. अण्णा हजारे यांना विषय समजावून सांगितला. देशातील त्रीभाजन झालेला एकमेव मतदारसंघ मी वाचविला. ही तळतळ आहे, खदखद आहे. आज जे सुरू आहे ते कोणाच्या जिवावर सुरू आहे ?
शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार !
गेल्या १५ वर्षात शिवसैनिंकांचा संच मी सांभाळला. राजकारणात उलथापालथ होत असते. मी काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. माझे वडील आमदार होते, पत्नी सभापती तर मी जि. प. सदस्य व तिनदा आमदार होतो. जनतेने आमच्या कुटूंबावर प्रेम केले. विश्वास टाकला. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी लढणार अशी प्रतिज्ञा औटी यांनी केली.
शंकरराव तुम्ही पालकमंत्री व्हा !
सामान्य जनतेच्या हितासाठी मंत्री गडाख यांनी आमच्या पाठीशी उभं रहावं. तुम्ही जिल्हयाच्या राजकरणात फार मोठे व्हाल असे सांगून तुम्ही जिल्हयाचे पालकमंत्री व्हा, वेळ आली तर आम्ही उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी येऊ.
घड्याळाचा मत द्यायला सांगणार नाही !
आता निवडणूका जवळ आल्यात. राज्यात काय होईल याची कल्पना नाही. मात्र आम्ही काही घडयाळाला मत देण्यासाठी कोणाला सांगणार नाही. जे आमच्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही लढा देऊ. माणूस भरडला जात असेल तर असा निर्णय घ्यावाच लागेल. निर्णय घेण्यापूर्वी उध्दवजी यांच्याशी चर्चा करू. या मतदासंघात सुसंस्कृतपणाचा अभाव असल्याचेही औटी म्हणाले.