पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
श्वान व खंडोबाचं नातं सर्वश्रुत आहेच. राज्यातील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थान येथे दररोज होणाऱ्या आरतीवेळी तेथील श्वान शंखनाद करून आरतीमध्ये सहभागी होत असल्याचा अनुभव भाविक घेत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून देवस्थाने बंद असल्यामुळे कोरठण खंडोबाचा गड भाविकांविना सुना सुना होता. घटस्थापनेपासून करोनाचे नियम पाळून देवस्थाने उघडण्याची परवाणगी शासनाने दिल्यानंतर देवस्थान परीसर भाविकांनी फुलून गेला आहे. आळे ता. जुन्नर येथील ज्योतीष विशारद संजय किसन भुजबळ यांनी नुकतीच गडाला भेट दिली. त्यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री यमुनाबाई भुजबळ, चिरंजिव श्रीरूध्द, कन्या भुवनेश्वरी हे होते. त्यांनी देवस्थानास शंखनाद करणाऱ्या श्वानाचे दान देत खंडोबाप्रती असलेली त्यांच्या कुटूंबियांची श्रध्दा अधोरेखीत केली. मंदीर उघडल्यानंतर प्रथमच श्वानाचे हे दान मिळाले आहे. देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडूरंग गायकवाड यांच्या हस्ते भुजबळ परिवाराचा शाल श्रीफळ तसेच खंडेरायांची प्रतिमा भेट देऊन भुजबळ परिवाराचा सन्मान करण्यात आला. या मंदीरात यापूर्वीही दोन श्वान होते. ते देखील आरतीच्या वेळी शंखनाद करीत. मात्र करोनाचे संकट येऊन मंदीर बंद करण्यात आल्याने मंदीरातील हे श्वानही परागंदा झाले होते. नव्या श्वानाच्या आगमनामुळे मंदीर परिसरात पुन्हा शंखनाद सुरू झाला आहे.