तहसिलदार ज्योती देवरे यांची पत्रकार परिषदेत माहीती
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
तालुक्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असल्याने पारनेर नगरपंचायत हद्दीसह संपूर्ण पारनेर तालुक्यात शुक्रवारपासूनच अचारसंहिता लागू झाली असल्याची माहीती तहसिलदार ज्योती देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध राजकिय पक्षांचे अध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सभापती, सदस्य, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध विभागांचे अधिकारी यांची तहसिलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीत आचारसंहिचेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सर्वांनी दक्षाता घेण्याच्या सुचना देवरे यांनी दिल्या. आचारसंहिता भंगाची तक्रार असल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. आचारसंंहिता लागू झालेली असतानाही वासुंदे येथे पिठाच्या गिरण्यांचे वितरण तसेच काही उदघाटने करण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून पोलिस प्रशासनास त्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे देवरे यांनी सांगितले.
कोणत्याही आर्थिक अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते बांधण्याचे वचन देणे या गोष्टी करू नयेत. निवडणूक मोहिम, प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम करू नये, मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये, कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये, यामध्ये ई कॉमर्स ऑनलाईन खरेदीचाही समावेश होत असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले.
मतदारांच्या जातीय व धार्मीक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये, विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनीक कार्याशी सबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टिका करण्याची परवाणगी देण्यात येऊ नये. ज्यांचा खरे – खोटेपणा पडताळून पाहिलेला नाही असे आरोप ठेवून किंवा त्यास विकृत स्वरूप देउन इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका करण्यात येऊ नये. निवडणूक प्रचार, तसेच भाषणे, निवडणूक प्रचार फलक, संगित इत्यादीसाठी कोणत्याही धार्मीक प्रार्थना स्थळांचा वापर करण्यात येऊ नये. लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहचिविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध असल्याचे तहसिलदारांनी स्पष्ट केले.
व्यक्तिंचे मते किंवा कृत्ये याविरूद्ध, निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नये. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवारभिंत इत्यादींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवाणगीखेरीज करणे, ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीस चिटकविणे, किंवा घोषणा इत्यादी लिहिणे यासाठी करता येणार नाही. यामध्ये खाजगी व सार्वजनीक जागांचा समावेश असेल.
इतर राजकिय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनीक सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये. एका पक्षाची सभा जेथे चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे प्रचार फेरी काढण्यात येऊ नये. इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा व मिरवणूकांमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करू नयेत. दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचार पत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत. मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिस किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. मतदानाच्या दिवशी ओळख चिठ्ठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे, किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.
ध्वनीवर्धकाचा मग तो एकाच जागी लावलेला असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेला असोत. सकाळी ६ वाजण्यापूर्वी किंवा रात्री १० वाजल्यानंतर आणि सबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पुर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करू नये. तसेच याबाबत असलेले ध्वनीप्रदुषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सबंधित प्राधिकाऱ्याची लेखी पूर्वपरवाणगी असल्याशिवाय सार्वजनिक सभेच्या जागी किंवा प्रचार फेरीत ध्वनीवर्धकाचा वापर करू नये. अशा सभा किंवा प्रचार फेरी रात्री १० वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवाणगी देण्यात येणार नाही. याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे. याखेरीज स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवष्यकतेचा स्थानिक दृष्टीकोन आणि हवामान, सणासुदीचा मोसम, परिक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असेल. निवडणूकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या मद्याचे वाटप करू नये अशी सक्त ताकीद तहसिलदार देवरे यांनी दिली आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, वनकुट्याचे सरपंच अॅड. राहुल झावरे, शंकर नगरे, विजय डोेळ, पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मणे, पो. कॉ. भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होतेे.
पारनेर नगरपंचायत हद्दीत आचारसंहिता का ?
निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या गावालगतच्या गावात किंवा शहरात आचारसंहिता आपोआप लागू होते. पारनेर शहरालगतच्या हंगे, पानोली, लोणीहवेली, चिंचोली या गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असल्याने तसेच तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने पारनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी स्पष्ट केले.