पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
निघोज ते टाकळीहाजी (जि. पुणे) रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. (टाकळीहाजी ता. शिरूर जि.पुणे) शिवारात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमरास हा अपघात झाला. गंभीर जखमी तरूणावर पुण्यातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात स्थानिकांकडून मिळालेल्या माहीतीनुसार अशोक मुुरलीधर लामखडे व प्रशांत लामखडे हे दोन तरूण निघोज येथून टाकळीहाजी येथे जात होते. रस्त्यामध्ये त्यांच्या दुचाकीची उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडक झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, या अपघाताप्रसंगी असलेल्या प्रत्यक्षदर्शीचा शोध लागलेला नसल्याने नेमका अपघात कसा झाला यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे. काहींच्या मते दुचाकीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक झाली. व त्या एकजण जागीच गतप्राण झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
घटनेची माहीती समजल्यानंतर स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथून ट्रॅक्टर पसार झाला होता. नागरीकांनी जखमी प्रशांत यास शिरूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्यास पुण्यास हालविण्यात आले. अशोक लामखडे हा जागीच गतप्राण झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी हालविण्यात आला.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांमध्ये तालुक्याच्या विविध भागांत अपघातांची मालीका सुरू असून त्यात निष्पाप नागरीकांचे बळी जात आहेत.