पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
नगर – कल्याण महामार्गावर दुचाकीस पिकअप व्हॅनने दिलेल्या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेल्या वेदांत दत्तात्रेय शिर्के या १८ वर्षीय युवकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. वेदांत हा नीलेश लंके प्रतिष्ठाणचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिर्के यांचा पुतण्या आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार वेदांत हा मित्रासोबत दुचाकीवरून कर्जुलेहर्या येथून आळेफाटा येथे जात होता. गावापासून काही अंतर पुढे गेल्यानंतर सावरगांव शिवारात रस्त्यात अचानक आडव्या आलेल्या पिकअप व्हॅनने वेदांतच्या दुचाकीस जोराची धडक दिली. त्यात त्याच्या डोक्यास गंभीर स्वरूपाची जखम झाली होती.
जखमी अवस्थेत वेदांत यास नगरच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर गेल्या चार पाच दिवसांपासून उपचार सुरू होते. शनिवारी रात्री उपचार सुरू असताना त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. वेदांत याच्या अपघाती निधनामुळे टाकळीढोकेश्वर परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नगर पुणे महामार्गावर दुचाकीस शिवशाही बसने ठोकर दिल्याने शुक्रवारी दोघांना प्राण गामावावे लागले. त्यापाठोपाठ नगर – कल्याण महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या युवकाचेही निधन झाल्याने तालुक्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.