महामार्गावरील पुलाला कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील चार प्रवासी ठार झाले. आज बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
सोलापूर : पारनेर अपडेट मिडिया
सोलापूर-विजापूर महामार्गावरील कवठे गावाजवळील पुलाला धडकून कार मधील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी आहे. हा अपघात आज (दि.०५) बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. अपघातातील मयत व जखमी हे सर्व कर्नाटकातील आहेत.
अरुण कुमार लक्ष्मण (२१), महीबूब मोहम्मद अली मुल्ला (१८), फिरोज सैफसाब शेख (२०), मुन्ना केंभावे (२१) (सर्व रा. यरकल केंडी, तालुका सिंदगी, जिल्हा विजापूर, कर्नाटक) अशी अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांची नावे आहेत.
अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी हे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास कारने विजापूर ते सोलापूर नवीन महामार्गावरून सोलापूरकडे येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजापूर महामार्गावरील नवीन कवठे गावाजवळील पुलास कारची धडक बसून झालेल्या अपघातात कार मधील सर्व जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार आर. ए. जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टर रोहित पाटील यांनी सांगितले.